महापौरांचा राजीनामा टळला
By admin | Published: November 8, 2015 08:58 PM2015-11-08T20:58:27+5:302015-11-08T23:35:11+5:30
जयश्रीतार्इंकडून कानउघाडणी : सत्ताधाऱ्यांत छुपा संघर्ष
सांगली : महापौर विवेक कांबळे यांना पदावरून हटविण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. पालिकेतील सत्ताधारी गटाच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी कारभारी नगरसेवकांची या प्रकरणावरून चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महापौरांच्या राजीनाम्याऐवजी त्यांच्याविरोधात छुपा संघर्ष करण्याची रणनीती आखली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात विवेक कांबळे यांची महापौरपदी निवड झाली. तेव्हा आणखी दोन ते तीनजण महापौर होतील, असे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात होते. त्यामुळे कांबळे यांचा दहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या तीन महिन्यांसाठी अन्य इच्छुकाला संधी मिळावी, म्हणून त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पण त्यांनी राजीनाम्यास स्पष्टपणे नकार दिला. साऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी भूमिका महापौर कांबळे यांनी घेतली. त्यांच्या या पवित्र्यामुळे पालिकेतील कारभारी नगरसेवक अडचणीत आले.
राजीनाम्याचे नाट्य गाजत असतानाच सत्ताधारी गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यात हस्तक्षेप केला. कारभारी नगरसेवकांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली. मदनभाऊंचे निधन होऊन महिनाही झाला नसताना, पालिकेतील खुर्चीचा खेळ योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेतील कारभारी नगरसेवकांची निराशा झाली आहे.
त्यामुळे आता महापौरांच्या महासभेतील कारभाराला चाप लावण्यासाठी छुप्या पद्धतीने व्यूहरचना आखली जात आहे. ऐनवेळी होणाऱ्या ठरावाला विरोध करण्यासाठी नगरसेवकांची फळी तयार केली जात आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात महापौरांविरोधातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
फरफट : स्वाभिमानी विकास आघाडीची!
महापालिकेतील सत्ताकारणात स्वाभिमानी आघाडीची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. पण नेमकी काय भूमिका घ्यायची, अशी द्विधास्थिती स्वाभिमानीची झाली आहे. यापूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या पाठीशी हा गट होता. आता विवेक कांबळे यांच्या कारभाराला या गटाचा हातभार लागत आहे. पालिकेत विरोधक म्हणून काम करणाऱ्या स्वाभिमानीने नेहमीच सत्तेशी सोयरीक साधली आहे. या आघाडीची ही फरफट थांबून कारभारावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
बाजार समिती संचालकपदाचा वाद उफाळणार
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महापालिकेचा प्रतिनिधी पाठविण्यावरून सत्ताधाऱ्यांत मतभेद निर्माण झाले आहे. या पदासाठी महापौर कांबळे इच्छुक आहेत. त्याशिवाय प्रशांत पाटील-मजलेकर यांचे नावही चर्चेत आहे.