नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:28+5:302020-12-30T04:35:28+5:30
इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत ११४ कोटींचा निधी आला तर तो गेला कुठे? या कालावधीत विशेष अनुदान १० कोटी ...
इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत ११४ कोटींचा निधी आला तर तो गेला कुठे? या कालावधीत विशेष अनुदान १० कोटी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामाचे दोन कोटी असे १२ कोटी रुपये सोडले तर इतर निधी कसा आणला, याचे उत्तर द्या. नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल करू नये. जयंत पाटील यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा त्यांनी शहराच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी टीका नगरसेवक शहाजी पाटील यांनी केली.
येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, शहरासाठी निधी आणताना विक्रम पाटील किंवा तुम्ही यापैकी कोणी प्रयत्न केले, हे सांगावे. या शहरावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नेहमीच प्रेम केले आहे. त्यामुळेच त्यांनी सर्व नागरिकांना वाढीव संकलित कराविरोधी अपील करण्याची संधी मिळावी म्हणून प्रशासनाला ही सुनावणी पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. डॉ. संग्राम पाटील म्हणाले, भुयारी गटार योजना ८० कोटींची आहे. पूर्वीच्या सरकारने रस्ते अनुदानासाठी दिलेले २३ कोटी ५८ लाख व ५ कोटींचे व्याज भुयारी गटारीकडे वर्ग केले. १४ व्या वित्त आयोगातून १६ कोटी वर्ग करण्यात आले. यापैकी फक्त १० कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहेत. भुयारी गटार योजनेला सरकारने शून्य रुपये दिले आहेत. .
आनंदराव मलगुंडे म्हणाले, अवैध बांधकामांना जेवढी घरपट्टी, तेवढाच दंड अशी वसुली सुरू आहे. हा विषय सभागृहासमोर आलेला नाही. एक वर्षच दंडाची आकारणी करून या बांधकामाचे नियमितीकरण करायला हवे.
पै. भगवानराव पाटील म्हणाले, नगराध्यक्षांनी नेत्यांवर आरोप करण्याचे सोडून किमान राहिलेल्या वर्षात त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी नगरसेवक विश्वास डांगे, कमल पाटील, हिंदुराव माळी उपस्थित होते.
चौकट
संभ्रमावस्था नको
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत ११४ कोटींचा निधी आणला, असे नगराध्यक्ष सांगत आहेत. त्यामुळे शहरात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा संभ्रम निर्माण होणार नाही, याची दक्षता नगराध्यक्षांनी घ्यावी.