महापौरांनी सईसमोरच आयुक्तांना खडसावले
By admin | Published: January 4, 2017 10:58 PM2017-01-04T22:58:26+5:302017-01-04T22:58:26+5:30
महापालिका : नगरसेवकांना कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही, स्वच्छता अभियानावरून नाराजीनाट्य
सांगली : महापालिकेच्या स्वच्छतादूत म्हणून सांगलीत आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्यासमोरच बुधवारी महापौर व आयुक्तांमध्ये नाराजीनाट्य रंगले. महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांनाही स्वच्छता अभियानाची माहिती व निमंत्रण देण्यात आले नसल्याने महापौरांनी आयुक्तांना खडसावले. या अभियानाकडे एकही पदाधिकारी फिरकला नाही. उपमहापौर विजय घाडगे यांनी तर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट करीत, आयुक्तच महापालिकेचे मालक बनल्याची टीका केली.
महापालिकेच्या ‘स्वच्छता दूत’ म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी त्या सांगलीत आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत सांगलीवाडीसह काही ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र प्रशासनाकडून या उपक्रमांची माहिती महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांच्यासह एकाही नगरसेवकाला देण्यात आली नव्हती. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सई ताम्हणकर यांचे स्वागत करीत, त्यांच्यासोबत अनेक भागात भेट दिली.
सांगलीवाडी येथील कार्यक्रमांची नगरसेवक दिलीप पाटील यांनाही कल्पना नव्हती. आयुक्त खेबूडकर, सई ताम्हणकर सांगलीवाडीत दाखल झाल्यानंतर मग दिलीप पाटील यांना निरोप देण्यात आला. अचानक आलेल्या या पाहुण्यांचे दिलीप पाटील यांनी स्वागत केले, पण त्यांचीही ऐनवेळी चांगलीच कसरत झाली.
दुपारी महापालिका मुख्यालयाला सई ताम्हणकर यांनी भेट दिली. महापौर शिकलगार यांच्या दालनात सई ताम्हणकर, खेबूडकर व इतर अधिकारी दाखल झाले. त्यांना अचानक आलेले पाहून काहीकाळ महापौरही अचंबित झाले. त्यांनी सई ताम्हणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला खरा, पण नंतर आयुक्तांना धारेवर धरले. ‘तुम्ही स्वच्छता अभियान घेता, त्याचे साधे निमंत्रणही जबाबदार पदाधिकाऱ्यांना देत नाही, हा काय प्रकार आहे? तुम्ही परस्परच कार्यक्रम घेणार आहात का?’ अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
महापौरांच्या या भूमिकेमुळे आयुक्तांचा चेहरा पडला होता. सई ताम्हणकर यांच्यासमोरच हा सर्व प्रकार सुरू होता. अखेर महापौरांनीच सांभाळून घेत, ‘हा आमच्या घरातील वाद आहे, नगरसेवक मला जाब विचारतील. त्यांना काय उत्तर द्यायचे ते बघू. आमचा स्वच्छता अभियानाला विरोध नाही’, असे म्हणत सावरून घेतले. पदाधिकारी आणि नगरसेवक कोणताही वाद तुटेपर्यंत ताणत नाहीत, असे सांगून आयुक्तांनीही वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे उपमहापौर विजय घाडगे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. स्वच्छता अभियानावर आमचा बहिष्कार आहे. प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. अशा अभियानाला कोणी विरोध करते का? पण प्रशासन जाणीवपूर्वक पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवून स्वत: मालक बनले आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. गटनेते शिवराज बोळाज यांनीही निमंत्रण नसल्याचे सांगितले.
एकूणच महपालिकेच्या या स्वच्छता अभियानाला सुरुवातीलाच वादाचे गालबोट लागले आहे. प्रशासनाकडून अभियानाची माहिती तर देण्यात आली नाहीच, शिवाय निमंत्रणही दिले नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाची भूमिका : एकला चलो रे!
स्वच्छता अभियानावरून महापालिकेत वाद निर्माण झाला आहे. यापूर्वीही पदाधिकारी विरुद्ध प्रशासन असे किरकोळ वाद झाले आहेत. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून प्रशासनाची ‘एकला चलो रे’ अशी भूमिका राहिली आहे. मध्यंतरी वनदिनाच्या कार्यक्रमावेळीही उपमहापौर विजय घाडगे, तत्कालीन स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांना बालाजीनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते, पण घाडगे व पाटील दोघेही उपस्थित होण्यापूर्वीच आयुक्तांनी हा कार्यक्रम उरकून घेतला होता. आताही तसाच प्रकार घडला आहे.