महापौर समस्या घेऊन येतच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:01 AM2017-09-16T00:01:25+5:302017-09-16T00:01:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्ह्याचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. मी पालकमंत्री झाल्यापासून एकदाही सांगलीचे महापौर विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. तर त्यांना निधी कुठून मिळणार, असा सवाल पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. उलट भाजपचे आमदार शहरात कामे करीत असताना, त्यांनाही खीळ घालण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केली. निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सांगलीत शुक्रवारी आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न विचारला असता, देशमुख म्हणाले की, सांगली, मिरज शहराच्या विकासाकडे कधीच आम्ही दुर्लक्ष केले नाही. विकास कामात राजकारण आणण्याची भाजपची रणनीतीच नाही. मी सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही महापालिकेचे महापौर, पदाधिकारी विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. मी तर शहराचा विकास करण्यासाठी अनेक योजनांचे नियोजन करत आहे. शहरातील समस्या घेऊन महापौर माझ्याकडे आले, तर निश्चितच ती विकास कामे मार्गी लावण्यात येतील. महापौरांनाच शहरातील प्रश्न सोडवायचे नसतील, तर आम्ही त्याला काय करणार?, असा टोलाही देशमुख यांनी महापालिकेतील सत्ताधाºयांना लगावला.
ते म्हणाले की, विकास कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे निधीची कोणतीही अडचण नाही. सांगली शहरात आमदार सुधीर गाडगीळ, मिरज शहरात आमदार सुरेश खाडे विकास कामे घेऊन शासनाकडे जातात. त्यासाठी लागणारा निधी खेचून आणतात. पण, याला महापालिकेतील सत्ताधाºयांकडून हवे तेवढे सहकार्य मिळत नसल्याची टीकाही देशमुख यांनी केली.
दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफीचे पैसे मिळणार
कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आम्ही पुन्हा कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसात अर्जांची छाननी आणि सोशल आॅडिट करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी महसूल, सहकार विभागाच्या अधिकाºयांना रात्रीचा दिवस करून कामे पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आॅक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होतील, असा विश्वासही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
उद्योग वाढीला उद्योजकांचेही प्रयत्न हवेत
सांगलीचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पण, यासाठी उद्योजकांनीही काही प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्या, नवीन प्रकल्प याबाबत सूचना आणि प्रस्ताव देण्याची गरज आहे. मीही उद्योजक आहे. पण, सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही उद्योजक माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले नाहीत. त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, असा टोलाही सुभाष देशमुख यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला लगावला.
‘भाजप’कडूनच
रडीचा डाव : महापौर
पालकमंत्र्यांच्या आरोपाला महापौर हारूण शिकलगार यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, महापालिकेच्या विकासकामात कोण अडवाअडवी करीत आहे, हे साºयांनाच माहीत आहे. पालकमंत्री देशमुख यांच्यासह भाजपचे नेतेच विकासकामांच्या आड येत आहेत. त्याला आयुक्त रवींद्र खेबूडकर यांचीही साथ आहे. मंजूर २२ कोटींची कामे आयुक्तांमार्फत अडवून जनतेला व शहराला खड्ड्यात कोणी घातले आहे? आयुक्तांचे बोलवते धनी हे भाजप नेते, पालकमंत्रीच आहेत. हिंमत असेल तर स्वच्छ हेतूने जनतेसमोर जावे. आम्ही मंजूर केलेली कामे आयुक्तांमार्फत अडवून रडीचा डाव खेळू नये, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.