महापौरांचाही दबावगट
By admin | Published: November 8, 2015 12:01 AM2015-11-08T00:01:31+5:302015-11-08T00:06:09+5:30
राजीनाम्याचा प्रश्न : अनेक ठरावांवर केल्या स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या
सांगली : महापौर विवेक कांबळे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी गटात एक दबावगट तयार झाला असतानाच, महापौरांनी स्वाभिमानी आघाडीतील काही सदस्यांना घेऊन अॅँटी दबावगट स्थापन्याच्या हालचाली सुरू केल्या
आहेत. यासाठी महापौरांच्या अॅँटीचेंबरला शनिवारी दीड तास चर्चा झाली. एकमेकांना सहकार्य करण्याच्या अटीवर हे सदस्य एकत्र आले आहेत.
कांबळे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधाऱ्यांचाच एक गट आक्रमक झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते मदन पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. दोन दिवसांपूर्वी याचसंदर्भात झालेल्या चर्चेवेळी तूर्त राजीनाम्याचा विषय काढू नये, असे जयश्रीतार्इंनी सांगितल्याचे समजते. महापौरांच्याच गटातील काही सदस्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राजीनाम्याचा विषय आला तर त्याला शह देण्यासाठी दुसरा दबावगट तयार करण्यासाठी कांबळे सरसावले आहेत. त्यांनी स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांना एकत्रित केले आहे.
यासंदर्भात शनिवारी त्यांच्या अॅँटीचेंबरला बैठक झाली. यावेळी संबंधित सदस्यांची कामे करण्याच्या बदल्यात सदस्यांनी महापौरांना सहकार्य करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. चर्चेबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.
महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेपूर्वी गटनेते किशोर जामदार यांनी महापौर कांबळे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची मागणी केली. मदन पाटील यांनी शेवटचे तीन महिने मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांना संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या इच्छेनुसार आपण राजीनामा द्यावा, असा निरोप दिला; पण त्याचवेळी महापौर कांबळे यांनी राजीनाम्याला बगल दिली होती. मदनभाऊ हयात असताना पालिकेत त्यांचा शब्द अंतिम होता; पण त्यांच्या निधनानंतर आता पालिकेची गणिते बदलली आहेत.
मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आले आहे, तर काँग्रेसचे दुसरे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेही मत याबाबत घ्यावे लागणार आहे. तरीही आताच राजीनाम्याची चर्चा करणे व त्यावरून राजकारण करण्याबाबत नेते सकारात्मक प्रतिसाद देतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
ठराव खोडला...
४महापौर कांबळे आणि स्वाभिमानीच्या गट्टीचा पहिला प्रसंग शनिवारी समोर आला. सांगली बाजार समितीच्या स्वीकृत सदस्यपदी स्वत:च्या निवडीचा ठराव महापौरांनी ऐनवेळच्या विषयात तयार केला आहे.
४सभेतील अनेक ऐनवेळच्या ठरावांप्रमाणे या ठरावावरही स्वाभिमानी सदस्य शिवराज बोळाज आणि बाळासाहेब गोंधळी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. ही बाब सत्ताधाऱ्यांतील दुसऱ्या गटास कळाल्यानंतर सायंकाळी त्यांनी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी दोन्ही सदस्यांना त्यांनी बोलाविले होते.
४पक्षाचा हा अंतर्गत विषय असताना सह्या का केल्या, अशी विचारणा बोळाज व गोंधळी यांना करण्यात आली. सह्या करताना ही बाब लक्षात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून ठरावावरील स्वत:ची नावे व स्वाक्षऱ्या खोडून टाकल्या. त्यामुळे हा ठराव वादात सापडला आहे.