महापौरांच्या राजीनाम्याचे घोडे अडल
By Admin | Published: January 7, 2015 11:05 PM2015-01-07T23:05:27+5:302015-01-07T23:25:23+5:30
पुढील आठवड्यात सभा : सांगली-मिरजेतील नगरसेवकांत उत्सुकतो
सांगली : महापौर कांचन कांबळे यांच्या राजीनाम्याविषयी महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा असून, जानेवारी महिन्याच्या महासभेत त्यांचा राजीनामा होणार का? याची उत्सुकता सत्ताधारी नगरसेवकांसह इच्छुकांना लागली आहे. त्यात कांबळे यांना अद्याप सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी राजीनामा देण्याविषयी आदेश दिले नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेत सध्या महापौर कांचन कांबळे यांच्या राजीनाम्याचीच चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापौर बदल करण्याचा निर्णय मदन पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार काही ज्येष्ठ नगरसेवकांना त्यांनी शब्दही दिला होता. निवडणुकीतील पराभवानंतर मदन पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीतही महापौर बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतरही गेले दोन महिने महापौरांच्या राजीनाम्याचे घोडे अडले आहे.
नव्या वर्षात महापौरांचा राजीनामा होईल, असा दावा इच्छुकांनी केला आहे. कांबळे यांनी महिन्याभराची मुदतवाढ मागितल्याचे समजते. आता ती मुदतही संपली आहे. त्यांच्या राजीनाम्याचा फार गाजावाजा होऊ नये, यासाठीच सत्ताधारी गटाने डिसेंबर महिन्यात महासभाच घेतली नाही. त्यामुळे इच्छुक नगरसेवक धास्तावले होते. गटनेते किशोर जामदार यांना महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांची समजूत काढण्याची वेळ आली होती. जानेवारी महिन्याच्या महासभेत कांबळे यांचा राजीनामा होईल, असे सांगितले जात असतानाच, पुन्हा एकदा त्याला फाटे फुटू लागल्याची चर्चा आहे. महापौरांना राजीनामा देण्याचे आदेश मदनभाऊंनी दिले नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत. जोपर्यंत मदनभाऊंचा आदेश येत नाही, तोवर राजीनाम्यावर चर्चा नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
विकास महाआघाडीच्या काळात इद्रिस नायकवडी यांनी आ. जयंत पाटील यांच्याविरोधात बंड करून अडीच वर्षे महापौरपदाचा लाभ घेतला होता. हा अनुभव ताजा असल्यानेच सत्ताधारी काँग्रेसची नेतेमंडळी महापौर कांबळे यांच्या राजीनाम्याविषयी सावध पावले उचलत आहेत. येत्या १९ जानेवारी रोजी नव्या वर्षातील पहिली महासभा होणार आहे. या सभेत महापौरांचा राजीनामा होईल, असा दावा इच्छुक मंडळी करू लागली आहे. त्यामुळे विद्यमान महापौरांचा राजीनामा होणार की त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार, याची उत्सुकता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही लागली आहे. (प्रतिनिधी)
इच्छुक गॅसवर
महापौरपदासाठी सध्या विवेक कांबळे, बसवेश्वर सातपुते इच्छुक आहेत. त्यात विवेक कांबळे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून कांबळे यांनी महासभा घेण्यासाठी गटनेत्यांकडे तगादा लावला होता. गटनेत्यांनीही त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. आता महापौरांचा राजीनामा होणार की नाही, याची धास्ती लागल्याने इच्छुक गॅसवर आहेत.