महापौरांचा राजीनाम्यास नकार
By Admin | Published: November 3, 2015 11:46 PM2015-11-03T23:46:24+5:302015-11-03T23:59:53+5:30
सांगली महापालिका : काँग्रेसअंतर्गत संघर्ष उफाळला; जयश्रीताई पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष
सांगली : काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने माझा राजीनामा मागितलेला नाही. अन्य कुणाला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत महापौर विवेक कांबळे यांनी राजीनामा देण्यास मंगळवारी नकार दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसअंतर्गत संघर्ष उफाळला आहे. दरम्यान, महापौरविरोधी गटाने त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांच्याकडे प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय राजीनाम्याचा निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेपूर्वी गटनेते किशोर जामदार यांनी महापौर कांबळे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची मागणी केली. मदन पाटील यांनी शेवटचे तीन महिने मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांना संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या इच्छेनुसार आपण राजीनामा द्यावा, असा निरोप दिला; पण त्याचवेळी महापौर कांबळे यांनी राजीनाम्याला बगल दिली होती. ते राजीनामा देणार नाहीत, अशी चर्चा मंगळवारी काँग्रेस गोटात होती. राजीनाम्यासाठी नेत्यांनीच आदेश द्यावे लागतील, असा सूरही होता.
मदनभाऊ हयात असताना पालिकेत त्यांचा शब्द अंतिम होता; पण त्यांच्या निधनानंतर आता पालिकेची गणिते बदलली आहेत. मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आले आहे, तर काँग्रेसचे दुसरे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेही मत याबाबत घ्यावे लागणार आहे.
नगरसेवकांची बैठक : काय घडले फार्महाऊसवर
जानेवारीमध्ये कांचन कांबळे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नव्या महापौर निवडीसाठी मदनभाऊ पाटील यांच्या कळंबी येथील फार्महाऊसवर नगरसेवकांची बैठक झाली होती. बैठकीत विवेक कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कांबळे हे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष होते; पण त्यांनी पक्षाचा त्याग करून काँग्रेसच्या चिन्हावर पालिका निवडणूक लढविली होती. सभागृहातही ते ज्येष्ठ असल्याने त्यांना सर्वप्रथम संधी दिली. याच बैठकीत मदनभाऊंनी उर्वरित सव्वा वर्षात तीन महापौर करायचे आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते; पण उर्वरित दोन महापौर पदाच्या दावेदारांची नावे जाहीर केली नव्हती. विवेक कांबळे यांना सहा महिने व उर्वरित सहा महिन्यांत आणखी दोन महापौर, असा फॉर्म्युला होता. त्यामुळे बसवेश्वर सातपुते अथवा शेवंता वाघमारे यांच्या नावाची चर्चा झाली नव्हती, असा दावा महापौर समर्थक करीत आहेत.