पोलिस भरतीसाठी एमबीए, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर !
By admin | Published: March 24, 2017 11:36 PM2017-03-24T23:36:07+5:302017-03-24T23:36:07+5:30
शासकीय नोकरीच हवी : बेरोजगारी आणि वाढत्या स्पर्धेमुळे नाईलाजास्तव खाकी वर्दीकडे आकर्षित झाल्याचे युवकांची भूमिका
सातारा : सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नोकरीसाठी प्रत्येकाला जिवाचे रान करावे लागत आहे. उच्चशिक्षित युवक बेरोजगार होत असल्याने मिळेल ती शासकीय नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी सध्याच्या पिढीतील युवकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्हा पोलिस दलातील भरतीला यंदा जवळपास पाच हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी काहीजण गैरहजर राहत आहेत तर काहीजण अपात्र ठरत आहेत. ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी पोलिस परेड ग्राऊंडवर जाऊन काही युवकांशी चर्चा केली. त्यावेळी अनेकांनी आपले खरे शिक्षण सांगितले. परंतु काही युवकांना आपले शिक्षण सांगणे अपमानस्पद वाटत होते.
‘आम्ही शिक्षण सांगतो; पण आमची नावे छापू नका,’ असे बरेचजण सांगत होते. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर घडाघडा बोलू लागले. फलटण येथील एक युवक सध्या पुणे येथे एका कंपनीत काम करतो. तो एमबीए झाला आहे. भाऊ पोलिस दलात असल्याने मीही खाकी वर्दीकडे आकर्षित झाल्याचे तो सांगत होता. पाटण तालुक्यातील दुर्गम भागात राहणारा अनिकेत (नाव बदलले आहे) हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. दोन वर्षे झाले त्याने ही पदवी घेतली आहे. पुण्यातील कंपनीत तो काम करत आहे. या ठिकाणी नोकरीची हमी आणि सुरक्षितता नसल्यामुळे शासकीय नोकरी हवी, असे त्याचे मत आहे. साताऱ्यातील राजेंद्र हा युवक तर बी.एस.सी.बी.एड झाला आहे.
काही वर्षांपासून तो शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. मात्र, या ठिकाणी त्याला तुटपुंजे मानधन आणि घरातील जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे तो पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भरतीसाठी मैदानात उतरलाय.
पोलिस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांचा भरणा अधिक आहेच; परंतु टेक्निकल कोर्स पूर्ण केलेले युवकही यामध्ये मागे नाहीत. ‘आयटीआय’चा कोर्स केलेले युवकही भरतीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. नोकरीसाठी आयुष्यभर भटकण्यापेक्षा शासकीय नोकरी केव्हाही चांगली, असे अनेक युवक बोलत होते. पोलिस दलात एकदा इन्ट्री झाल्यानंतर पुढे खात्याअंगतर्गत परीक्षा देऊन मोठे अधिकारी होण्याचे स्वप्नही बऱ्याच युवकांनी पाहिल्याचे दिसून आले. भरतीसाठी शंभर टक्के योगदान देण्याचा निश्चय युवकांनी केला आहे. (प्रतिनिधी)