इस्लामपूरमधील ‘त्या’ रस्त्याचे मोजमाप केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:31+5:302021-01-15T04:22:31+5:30
इस्लामपूर : विशालनगर येथील खडतर रस्त्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी स्वत: जाऊन ...
इस्लामपूर : विशालनगर येथील खडतर रस्त्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी स्वत: जाऊन त्या रस्त्याचे मोजमाप केले. त्यामुळे हा रस्ता लवकरच होणार, अशी भावना या परिसरातील नागरिकांची झाली आहे, तर विरोधी राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते अंगराज पाटील यांनी, प्रभागातील रस्ते करण्यासाठी अनेकवेळा पालिकेकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.
सध्या या रस्त्यासाठी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. विद्यमान नगरसेविका प्रा. सविता आवटे या प्रभाग ६ मध्ये नेहमीच संपर्कात आहेत. नगरसेविका झाल्यापासून येथील रस्ते होण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. महाआघाडी सत्तेवर आल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत येथील संपूूर्ण रस्ते होतील, असा विश्वास अंगराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
विशालनगर ते शिराळा नाकापर्यंत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या परिसरात राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ताधारी विकास आघाडीने या रस्त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याची चर्चा होती. यावर ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी रस्त्याचे मोजमाप करण्यास प्रारंभ केला. परंतु रस्ता केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, सत्ता विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्यातील श्रेयवादामुळे हा रस्ता होणार का? याकडे प्रभाग ६ मधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
फोटो -१४०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर रस्ता न्यूज
ओळ : विशालनगर येथील रस्ता करण्यासाठी स्वत: विक्रमभाऊ पाटील यांनी मोजणी केली.