तीस हजारी गाडी, थाट तिचा राजेशाही! सांगलीत जिप्सीनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:06 AM2022-01-14T09:06:52+5:302022-01-14T09:24:12+5:30
Sangli : कर्नाळ रस्त्यावर काकानगरमध्ये अशोक आवटी यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. फावल्या वेळेत काहीतरी वेगळे बनविण्याचा छंद असलेल्या आवटी यांच्या मनात जुनी फोर्ड गाडी भरली.
सांगली : सांगलीतील अशोक संगाप्पा आवटी या कारागिराने अवघ्या ३० हजार रुपये खर्चात १९३० मॉडेलची फोर्ड गाडी साकारली आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ३० किलोमीटरची रपेट मारणारी ही गाडी भलतीच नखरेल बनली आहे.
कर्नाळ रस्त्यावर काकानगरमध्ये अशोक आवटी यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. फावल्या वेळेत काहीतरी वेगळे बनविण्याचा छंद असलेल्या आवटी यांच्या मनात जुनी फोर्ड गाडी भरली. त्यासाठी एम ८० मोपेडचे इंजिन बसविले. रिक्षाचे सुटे भाग वापरले. दोन वर्षांपासून त्यांचा खटाटोप सुरू होता. १५ दिवसांपूर्वी ती प्रत्यक्षात आली.
या रुबाबदार गाडीमध्ये एकावेळी चालकासह चौघे प्रवास करू शकतात. गाडीची बॉडी पत्र्याची व मजबुतीसाठी आतून लोखंडी अँगल अशी तिची बनावट आहे. ‘सेम टू सेम’ फोर्ड कंपनीच्या गाडीसारखी रंगरंगोटी केल्याने पाहताक्षणी ऐतिहासिक भासते. तिच्यावर रंगरंगोटी व चित्रकारीदेखील ऐतिहासिक पद्धतीची केली आहे.
जुगाड जिप्सीनंतर मिनी फोर्ड
नुकताच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांनी अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन याच्या माध्यमातून जुगाड जिप्सी तयार केली आहे. याची उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील दखल घेतली. त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेत आहे. असताना सांगलीतल्या अशोक आवटी यांनीही एक जुगाड चार चाकी गाडी बनवली आहे. या गाडीचा आता सांगलीत बोलबाला आहे.
धड छोटे खेळणेही नाही आणि मोठे वाहनदेखील नाही अशी गाडी पाहण्याजोगी तशीच अनुभवण्याजोगी बनली आहे. कुटुंबासह आवटी प्रवास करतात, तेव्हा राजेशाही प्रवासाचा फील येतो. गाडीसाठी सर्व भंगार साहित्य वापरल्याने फक्त ३० हजारांत काम फत्ते झाले आहे.
अशोक मेस्त्रीची पवनचक्की राज्यभर गाजली
काहीतरी ‘डोकॅलिटी’ चालविणाऱ्या अशोक आवटी यांनी यापूर्वी छोटी पवनचक्की तयार केली आहे. त्यातून घरापुरती वीजनिर्मितीही करतात. ही पवनचक्की राज्यात आणि राज्याबाहेरही गाजली होती. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे.