‘मेडिकल हब’ला औषधी क्षेत्राची ‘संजीवनी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:37+5:302021-04-25T04:25:37+5:30
जिल्ह्यात औषध निर्मिती उद्योग तुलनेने कमी असलेतरी ‘रिपॅकिंग’ व्यवसाय उल्लेखनीय असल्याने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळाला आहे. जिल्ह्यात सांगली-मिरजेत ...
जिल्ह्यात औषध निर्मिती उद्योग तुलनेने कमी असलेतरी ‘रिपॅकिंग’ व्यवसाय उल्लेखनीय असल्याने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळाला आहे. जिल्ह्यात सांगली-मिरजेत अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून वैद्यकीय उपचार केले जात आहेत. यासाठी आवश्यक असणारी औषधांची आवक जिल्ह्यात होत असते. अगदी परदेशातून औषधे, उपकरणांचीही आयात होते. जिल्ह्यात सध्या तीन ठिकाणी औषधांची निर्मिती होते. हिमाचल प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा भागात उत्पादित औषधे येत असतात. मात्र, ती थेट न येता त्या कंपन्यांचे ‘सुपर स्टॉकिस्ट’ ते वितरीत करतात. राज्यात भिवंडी, पनवेल, पुणे आणि नागपूर याठिकाणी हे वितरक आहेत. या वितरकांकडून जिल्हा वितरक व त्यांच्याकडून दुकानदारांना औषधे उपलब्ध होता. अभिमानास्पद बाब म्हणजे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी पुणे, मुंबईत बस्तान बसवत राज्यभरात औषध विक्रीचा विस्तार केला आहे.
रिपॅकिंगमध्ये तीळ तेल, निलगिरी तेल, बोरीक पावडर यासह आयुर्वेदिक औषधांचे रिपॅकिंग करणारे उद्योग असून त्यांचा सर्वत्र नावलौकिकही आहे.
जिल्ह्यातील वाढते पशुधन लक्षात घेता जनावरांच्या औषधांचाही उद्योग वाढत आहे. जिल्ह्यात सांगली, मिरजसह विटा आणि इस्लामपूर याठिकाणी औषधांचे वितरक कार्यरत आहेत. या वितरकांनी सांगलीसह सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकातही औषध विक्री करत क्षेत्र वाढवले आहे. एकूण व्यवसायापैकी ८० टक्क्यांहून अधिक सांगली मिरजेतच एकवटला आहे.
कोट
कोरोनाची चिंताजनक स्थिती गेल्या वर्षांपासून आपण सारे अनुभवत आहोत. मात्र, यापूर्वीही नेहमीच जोखीम पत्करून औषध व्यावसायिकांनी रुग्णांची सेवा केलेली आहे. आताही कोरोना कालावधीत समोर येणारा रुग्ण कोण आहे हे न पाहता त्यास औषध मिळावे या सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधव कार्यरत आहेत.
- विशाल दुर्गाडे, अध्यक्ष, केमिस्ट संघटना
चौकट
जिल्ह्यातील एकूण औषध व्यावसायिक २६००
होलसेल दुकानदार १५०
औषधांचे उत्पादन करणारे ३