मिरज सिव्हिलमध्ये कोरोना कक्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा धुडकूस, सामूहिक नृत्य व क्रिकेटचा रंगला सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:08 PM2022-01-10T13:08:25+5:302022-01-10T13:09:30+5:30
सिव्हिलमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाधित झाल्याने जिल्हा प्रशासन व सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व विद्यार्थी व आंतरवासिता रुग्णांना आंतररुग्ण कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोनाबाधित झाल्याने उपचार घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांपैकी काहीजण कोविड आंतररुग्ण विभागात दंगा, सामूहिक नृत्य व क्रिकेट खेळत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. क्रिकेट खेळणाऱ्या चार विद्यार्थ्यांना सिव्हिल प्रशासनाने कारवाईची नोटीस बजावली आहे, तर इतरांचा शोध सुरु आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० दिवसांपूर्वी एकाच वेळी तब्बल ९७ विद्यार्थी कोरोना बाधित झाले. सिव्हिलमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाधित झाल्याने जिल्हा प्रशासन व सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व विद्यार्थी व आंतरवासिता रुग्णांना आंतररुग्ण कक्षात उपचारासाठी दाखल करून त्यांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
आठवडाभर उपचारानंतर सर्व विद्यार्थी कोरानामुक्त झाले. मात्र कोविड आंतररुग्ण विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या काही विद्यार्थांनी दंगामस्ती, चित्रपट गीतावर सामूहिक नृत्य व क्रिकेट खेळल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. याबाबत काही विद्यार्थांच्या पालकांनी तक्रार केल्याने सिव्हिलच्या वैद्यकीय अधीक्षकांनी क्रिकेट खेळणाऱ्या चार विद्यार्थी -विद्यार्थिनींना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर दंगा व सामूहिक नृत्य करणाऱ्या विद्यार्थांचा शोध घेण्यात येत आहे.
रुग्णालयात दाखल होताना प्रत्येक विद्यार्थ्यास शिस्त पाळण्याचे तोंडी आदेश देऊनही दि. २९ डिसेंबर ते व दि. ०४ जानेवारीदरम्यान आंतररुग्ण कक्षात काही रुग्ण विद्यार्थ्यांनी बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी आंतररुग्ण कक्षात दंगा व सामूहिक नृत्य करणाऱ्या संबंधित विद्यार्थांची यादी देण्याचे लेखी आदेश वाॅर्डामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
सचिवांनी केली होती पाहणी
मिरज सिव्हिलमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याने या घटनेच्या चाैकशीसाठी आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी सीसीटीव्हीतून वाॅर्डाची पाहणी केली असता वाॅर्डात कोरोना बाधित विद्यार्थिनींचे नृत्य सुरू असल्याचे दिसले. यामुळे विद्यार्थांच्या वाॅर्डाबाहेर प्राध्यापकांना बसवून प्रशासनास या विद्यार्थांची दंगामस्ती रोखावी लागली. बाधित विद्यार्थांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र त्यांना उपचारासाठी दाखल केले असल्याने त्यांनी आंतररुग्ण कक्षात दंगा घातला.