कोरोना बालकांवर उपचारासाठी वैद्यकीय टीम सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:31+5:302021-05-26T04:28:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाने आरोग्य यंत्रणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यादृष्टीने वाळवा तालुक्यातील बालरोग तज्ज्ञांशी बैठक घेऊन प्राथमिक टप्प्यातील तयारीवर चर्चा झाल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
सबनीस म्हणाले, लहान मुलांवरील उपचार पद्धती आणि त्यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे, बालकांवरील प्रत्यक्ष उपचार, याबाबत बालरोग तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तिसऱ्या लाटेपूर्वी ही व्यवस्था सक्षम असावी, यासाठी तज्ज्ञांनी गट करून एखादे खासगी रुग्णालय उभा करता येऊ शकते का? यावर प्रामुख्याने चर्चा झाली. कामेरी रस्त्यावरील समाजकल्याण विभागाच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ऑक्सिजन व्यवस्था असणारे ५० बेड याकामी पुरविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे; मात्र लहान मुलांच्या गरजा लक्षात घेऊन हे रुग्णालय सुरू करावे लागेल, अशा सूचना बालरोग तज्ज्ञांनी केल्या आहेत.
या बैठकीत सर्व बालरोग तज्ज्ञांनी शासनास लागेल ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, बालरोगतज्ज्ञ नरेंद्र पोरवाल, अनिल भोई, अमित पाटील, सचिन पवार, मंदार कारंजकर, प्रशांत पाटील, वृषाली राजे, स्वाती पाटील, संदेश पाटील, एस.व्ही.पाटील उपस्थित होते.