कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:24+5:302021-04-21T04:26:24+5:30
मिरज : मिरजेजवळ बेडग रस्त्यावर वड्डी ग्रामपंचायत हद्दीत महापालिकेच्या कचरा डेपोत कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा व इतर टाकाऊ वस्तू ...
मिरज : मिरजेजवळ बेडग रस्त्यावर वड्डी ग्रामपंचायत हद्दीत महापालिकेच्या कचरा डेपोत कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा व इतर टाकाऊ वस्तू उघड्यावर टाकण्यात येत आहेत. याबाबत जाब विचारत सरपंच व सदस्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कचरा डेपो बंद करण्याचा इशारा दिला.
महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे व महापालिका अधिकाऱ्यांना वड्डी सरपंच व सदस्यांनी घेराव घालत प्रदूषणाबद्दल महापालिकेचा निषेध केला. महापालिकेचा वड्डी हद्दीत कचरा डेपो, कत्तलखाना व जैविक भस्मीकरण प्रकल्प आहे. जैविक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने कचरा डेपो व कत्तलखाना बंद करण्याची मागणी वड्डी ग्रामपंचायतीकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. महापालिकेच्या कचरा डेपोत कचरा पेटविण्यात येत असल्याने हवा प्रदूषित होऊन परिसरातील सात-आठ गावांची शेती व आरोग्य धोक्यात आले आहे. सतत प्रदूषणामुळे लोक आजारी पडून संसर्गजन्य व साथीचे आजार सुरू आहेत. जैविक भस्मीकरण प्रकल्प बंद असल्याने कोरोना रुग्णालयातील वैद्यकीय कचरा कचरा डेपोत उघड्यावर टाकला जात आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वड्डीच्या सरपंच अमिरुन वजीर व ग्रामपंचायत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. असा प्रकार आम्ही सहन करणार नाही. पुन्हा वैद्यकीय कचरा येथे टाकल्यास कचरा डेपो कायमचा बंद करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
उपायुक्त स्मृती पाटील यांनी कचरा डेपोची पाहणी करून महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना समज दिली. कचरा पेटविल्याने प्रदूषित हवेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याबाबत सरपंच व सदस्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पुन्हा असे प्रकार सुरू राहिल्यास ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कचरा डेपो बंद करणार असल्याचे सरपंच अमिरुन वजीर यांनी सांगितले.