गणेशोत्सव व्हावा विधायक कार्याचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:26 PM2017-08-22T23:26:40+5:302017-08-22T23:26:44+5:30

The medium of constructive work should be to celebrate Ganeshotsav | गणेशोत्सव व्हावा विधायक कार्याचे माध्यम

गणेशोत्सव व्हावा विधायक कार्याचे माध्यम

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विधायकतेच्या वाटेवरून गणेश मंडळांनी मार्गक्रमण करताना चांगला विचार दिला पाहिजे. ज्या दृष्टिकोनातून गणेशोत्सवाला सुरूवात करण्यात आली, त्या दृष्टिकोनाचे फलितही विधायक गणेशोत्सवातच आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंगळवारी ‘लोकमत संवादसत्रा’त व्यक्त केले.
सांगलीच्या लोकमत कार्यालयात ‘विधायक गणेशोत्सव’ या विषयावरील संवादसत्र पार पडले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम, डॉल्फिन नेचर ग्रुपच्या डॉ. पद्मजा पाटील, सावकार गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख अजिंक्य पाटील, अनिल शेटे, मोटार मालक संघाचे प्रमुख बाळासाहेब कलशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, चांदणी चौकातील ओम गणेश मंडळाचे प्रमुख लक्ष्मण नवलाई, प्रकाश जाधव उपस्थित होते. सांगलीच्या गणेशोत्सवातील विधायक गोष्टी, त्यात आवश्यक असलेली व्यापकता, पर्यावरणपूरक उत्सव, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंशिस्त, शहराची स्वच्छता आणि शहराच्या एकूण विकासातील मंडळांचे योगदान अशा विविध विषयांना स्पर्श करीत हे संवादसत्र रंगले. सहभागी सर्व मान्यवरांनी याबाबतची स्पष्ट मते मांडली.
गणेशोत्सवामधील होत असलेला खर्च कमी करण्यासाठी एकत्रितपणे काही उपक्रम राबविण्याबाबत मंडळांची तयारी असली तरी, त्यामध्ये राजकारण्यांकडून खोडा घातला जात असल्याची खंत यावेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अडचणी येत असल्या तरी, त्यातून मार्ग काढून व्यापक व विधायक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीतून, प्रबोधनाच्या कार्यक्रमातून पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रतिसाद मिळत असल्याचे समाधानही अनेकांनी व्यक्त केले.
नागरिकांकडून, मंडळांकडून निर्माल्य कुंडात निर्माल्य टाकणे, शाडूच्या, गाईच्या शेणापासूनच्या, मातीच्या मूर्तींचा वापर करण्याकडेही कल वाढला आहे. ्रमूर्तीदान संकल्पनेलाही गेल्या दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभत आहे. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून भविष्यात लवकरच आदर्श उत्सव म्हणून सांगलीच्या गणेशोत्सवाकडे पाहिले जाईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.

सार्वजनिक गणेश मंडळांकडून ३० टक्के मंडप रस्त्यावरच उभे केले जातात. वाहतुकीला अडथळा होऊ नये, तसेच अग्निशमन विभागाची गाडी जाते का? हे पाहूनच मंडप उभारणीला परवानगी दिली जाते. यावर्षी मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वाहतूक मार्गातील बदल व पार्किंग व्यवस्थाही झाली आहे. वाहतुकीचे नियम प्रत्येकाने पाळले तर, पोलिसांवरील ताण बºयापैकी कमी होईल. वाहतुकीची कोंडी होणार नाही. वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली आहे. दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत पोलिस रस्त्यावर असणार आहेत. यंदाही पोलिस विभागाने ‘जलयुक्त शिवार’ ही मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
- अतुल निकम, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.
गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च कमी करून समाजासाठी काही तरी करता येते, ही गोष्ट सावकार गणेशोत्सव मंडळाने दाखवून दिली आहे. सध्या कॉलेज कॉर्नर चौकाचे सुशोभिकरण मंडळामार्फत सुरू आहे. चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून मंडळ विधायक कामे करीत आहे. शहरातील सर्वच मंडळांसाठी एकच ध्वनीयंत्रणा व एकच मिरवणुकीचा उपक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये राजकारण शिरले. अजूनही आम्ही या गोष्टीसाठी आग्रही आहोत. सर्वच मंडळांनी पुढाकार घेतला तर, एक क्रांतिकारी पाऊल उत्सवाच्या निमित्ताने आपण टाकू शकतो.
- अजिंक्य पाटील, सावकार गणेशोत्सव मंडळ, कॉलेज कॉर्नर, सांगली
मंडळाच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. महापुरातही मंडळाने सेवा बजावली. आजवर कधीही उत्सवात चित्रपटातील गाणी आम्ही लावलेली नाहीत. आताचा उत्सव वेगळ््या पद्धतीने साजरा होत आहे. अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत. चित्रपटातील नको त्या आशयाची गाणी वाजतात. आपणच आपल्या दैवताची विटंबना करणे बरोबर नाही. उत्सवाच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी दिले पाहिजे. काहीतरी विचार आपण द्यायला हवा.
- लक्ष्मण नवलाई, ओम गणेश गणेशोत्सव मंडळ, चांदणी चौक, सांगली

सुंदर गजराज गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेली २० वर्षे आम्ही सामाजिक प्रबोधनावर भर दिला आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांनीही सामाजिक उपक्रमांवर भर देण्याची गरज आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. खड्ड्यापोटी मंडळांकडून घेण्यात येणाºया शुल्कामध्ये वाढ करावी. त्याला विरोध असेल तर, गणेश मंडळांवर खड्डे मुजविण्याची जबाबदारी सोपविली पाहिजे. डॉल्बी, महाप्रसादावर होणारा खर्च टाळून तो निधी सामाजिक कार्यासाठी वापरावा. काही चौकात मंडळाच्या साहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविता येतील. ज्यामुळे चेन स्नॅचिंग, भुरट्या चोºयांना पायबंद बसेल. युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठीही मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते, सांगली
डॉल्फीन नेचर ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षांपासून कृष्णा नदीत गणेश विसर्जनावेळी निर्माल्य संकलनाची मोहीम राबवित आहोत. विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या, नवव्या व अकराव्यादिवशी डॉल्फीनचे कार्यकर्ते दुपारपासूनच नदीवर थांबून लोकांना निर्माल्य नदीत न टाकता ते आमच्याकडे जमा करण्याचे आवाहन करतात. अनेकजण आता विसर्जनास आले की, आमच्याकडे स्वत:हून निर्माल्य देतात. निर्माल्य झाडाला टाकता येऊ शकते. त्याचा खत म्हणून वापर होतो. विसर्जनाला अनेकजण प्लॅस्टिक पिशव्याही घेऊन येतात. गतवर्षी एक खोली भरुन प्लॅस्टिक पिशव्या जमा झाल्या होत्या. त्यामुळे लोकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा.
- डॉ. पद्मजा पाटील, सचिव, डॉल्फीन नेचर्स ग्रुप, सांगली.

Web Title: The medium of constructive work should be to celebrate Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.