मिरज पंचायत समिती सभेत बहिष्काराचे नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 10:39 PM2016-03-10T22:39:17+5:302016-03-11T00:02:02+5:30

नाराजीचे पडसाद : कॉँग्रेससह ११ सदस्यांचा अघोषित बहिष्कार, जुळवाजुळव करून सभा आटोपली

Meeraj Panchayat Samiti meeting boycrackery drama | मिरज पंचायत समिती सभेत बहिष्काराचे नाट्य

मिरज पंचायत समिती सभेत बहिष्काराचे नाट्य

Next


मिरज : मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेवर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या ११ सदस्यांनी अघोषित बहिष्कार टाकला. सभापती निवडीवरून निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. तहकुबीचे सावट असणारी सभा ९ सदस्यांची जुळवाजुळव करून आटोपली.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती जयश्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभापती निवडीनंतर होणाऱ्या पहिल्याच सभेसाठी पाटील यांना सदस्यांची प्रतीक्षा करावी लागली. काँग्रेसच्या ४ व विरोधी पक्षाच्या सात सदस्यांनी सभेकडे पाठ फिरविली. एकाचवेळी अकरा सदस्यांनी सभेवर अघोषित बहिष्कार टाकल्याने सभापती निवडीवरून निर्माण झालेली सदस्यांची नाराजी दिसून आली. सभापती जयश्री पाटील यांंच्या निवडीला काँग्रेसमधील काही सदस्य वगळता बहुतांश सदस्यांचा विरोध होता. मासिक सभेच्या वेळेपूर्वी पंचायत समितीत येणाऱ्या सदस्यांची आजच्या सभेला प्रतीक्षा करावी लागली. अशोक मोहिते, सुभाष पाटील, दिलीप बुरसे या माजी सभापतींसह बाबासाहेब कांबळे व अलका ढोबळे हे पाचच सदस्य सभेसाठी आल्याने सभेवर तहकुबीचे सावट होते. मात्र सभापती जयश्री पाटील यांचे पती तानाजी पाटील यांनी गणपूर्तीसाठी काही सदस्यांशी संपर्क साधला. नांद्रेच्या सदस्या माणिकताई चौधरी यांना आणण्यात आले. सभा सुरू झाल्यानंतर राणी देवकारे व सभेच्या मध्यास तेजश्री चिंचकर उपस्थित राहिल्या. सभेस ९ सदस्य उपस्थित होते. कोरमसाठी ११ सदस्य आवश्यक असल्याने सभा तहकूब करण्यात येणार होती. मात्र नव्या कायद्यानुसार सात सदस्यांची संख्या ग्राह्य असल्याने सभा घेण्यात आली. विरोधी गटाचे सदस्य सतीश निळकंठ व शंकर पाटील हे पंचायत समितीत उपस्थित होते. मात्र त्यांनी सभेस जाण्याचे टाळले. सभेत विरोधी सदस्य गैरहजर राहिल्याने प्रश्नांची सरबत्ती दिसून आली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अशोक मोहिते, सुभाष पाटील, दिलीप बुरसे व बाबासाहेब कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केले. सभेत कृषी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, बांधकाम यासह विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. (वार्ताहर)


गैरसमज दूर करणार : सभापती
पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होतो. सदस्यांनी सभेस उपस्थित राहिल्यास प्रश्न सोडविणे शक्य होते. नेत्यांनी व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आपली सभापतीपदी निवड झाली आहे. सदस्यांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर केले जातील. सर्वच सदस्यांच्या सहकार्याने पंचायत समितीचा कारभार गतिमान करणार असल्याचे सभापती जयश्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Meeraj Panchayat Samiti meeting boycrackery drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.