काळ््या खणीबाबत उद्या मुंबईत बैठक
By admin | Published: May 8, 2016 12:37 AM2016-05-08T00:37:56+5:302016-05-08T00:37:56+5:30
सुशोभिकरणाचा फैसला : केंद्रीय सुकाणू समितीची उपस्थिती
सांगली : येथील काळी खण सुशोभिकरणाचा केंद्र शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दि. ९ मे रोजी केंद्रीय सुकाणू समिती मुंबईत येणार आहे. मंत्रालयातील पर्यावरण विभागात ही बैठक होणार असून, यामध्ये प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
शहरातील पुष्पराज चौकाजवळ सुमारे १० हेक्टर क्षेत्रात काळी खण असून, त्यातील पाण्याची सरासरी उंची साडेसहा मीटर आहे. या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन विभागाकडे सुरुवातीला १४ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्राथमिक मान्यताही दिली. पण न्यायालयीन वादामुळे महापालिकेला निधी प्राप्त होऊ शकला नाही. त्या प्रकल्पाचे २५ कोटींचे दुरूस्ती अंदाजपत्रक केंद्राला सादर झाले. पण २०१३-१४ ची दरसुची लागू झाल्यानंतर प्रकल्पाचा खर्च आणखी तीन कोटीने वाढला. २७.१८ कोटींच्या प्रस्तावाला राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतानाच जून २०१५ मध्ये केंद्रीय मंत्रालयाने याबाबतची फाईल गहाळ झाल्याची माहिती महापालिकेला कळविली. महापालिकेने पुन्हा नवा प्रस्ताव तयार करून पाठविला. तो आता ३० कोटींच्या घरात आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत काळी खण सुशोभिकरणाच्या प्रस्तावास मंजूरीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
काय आहे प्रस्तावात
या प्रकल्पातील २० टक्के हिस्सा राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाकडून प्राप्त होणार आहे, तर केंद्राकडून ७० टक्के निधी मिळणार होता. या प्रकल्पात सिल्ट ट्रॅप, कुंपण, वॉटर एरियेटर्स, पादचारी मार्ग, सायन्स सेंटर, चिल्ड्रन पार्क, मत्स्यालय, बोटिंग क्लब, अम्फी थिएटर आदीचा समावेश होता. काळी खण सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कोल्हापूरच्या रंकाळा तलाव सुशोभिकरणाच्या धर्तीवर ही योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.