आष्टा पालिकेची सभा पाच मिनिटात गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:55+5:302020-12-16T04:40:55+5:30
आष्टा : आष्टा पालिकेची सर्वसाधारण सभा केवळ ५ मिनिटात गुंडाळण्यात आली. सुमारे ३५ विषय चर्चा न होताच बहुमताने मंजूर ...
आष्टा : आष्टा पालिकेची सर्वसाधारण सभा केवळ ५ मिनिटात गुंडाळण्यात आली. सुमारे ३५ विषय चर्चा न होताच बहुमताने मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षनेते वीर कुदळे, वर्षा अवघडे व सत्ताधारी जलसंपदामंत्री जयंत पाटील गटाचे नगरसेवक अर्जुन माने यांनी सर्व विषयांवर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र ती नामंजूर झाल्याने त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. नगराध्यक्षा स्नेहा माळी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
आष्टा पालिकेची सभा मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन सुरू होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते वीर कुदळे, वर्षा अवघडे व अर्जुन माने यांच्या मागणीनुसार दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा पालिकेला ऑफलाईन सभा घेण्याबाबत मेल आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ऑनलाईन सभा रद्द करून अर्ध्या तासानंतर ऑफलाईन सभा सुरू करण्यात आली.
सुरुवातीला ऑनलाईन ७ विषय मंजूर झाल्याने माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार ऑफलाईन सभा घेण्यात येत आहे. सर्व ३५ विषयांवर सत्ताधारी गटाच्या बैठकीत यापूर्वी चर्चा झाल्याने सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात येत आहेत. त्याला सत्ताधारी गटातील सर्वच नगरसेवकांनी बहुमताने मंजुरी दिली. कोणतीही चर्चा न होता सर्व विषय मंजूर झाल्याने विरोधी गटनेते वीर कुदळे, वर्षा अवघडे व सत्ताधारी गटाचे अर्जुन माने यांनी आक्षेप नोंदविला.
बैठकीत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, सांगली जिल्हा वार्षिक योजना, चाैदावा वित्त आयोग, विशेष रस्ता अनुदान, सर्वसाधारण रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना यासह कोट्यवधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच काही कामांना मुदतवाढ देण्यात आली.
यावेळी विशाल शिंदे, संगीता सूर्यवंशी, पी. एल. घस्ते, धैर्यशील शिंदे, विकास बोरकर, शारदा खोत, जगन्नाथ बसुगडे, सारिका मदने, मनीषा जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.