पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी विभागीय आयुक्तस्तरावर बैठक, मुंबईत जन जलविकास परिषदेत कारणमीमांशा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:39 PM2022-03-23T13:39:09+5:302022-03-23T13:40:02+5:30
सांगली : राज्यातील पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तस्तरावर स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ...
सांगली : राज्यातील पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तस्तरावर स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. कोकण विभागातील समस्यांवर विचारासाठीदेखील मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंगळवारी आयोजित जन जलविकास परिषदेत त्या बोलत होत्या. मंत्री सामंत, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यावेळी उपस्थित होत्या. पूर व पाणीप्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विविध संस्था, संघटनांच्या पुढाकाराने परिषदेचे आयोजन झाले. महाराष्ट्रातील महापूर, कारणमीमांसा व उपाय या विषयावर परिषदेत चर्चा झाली. विविध संघटनांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन तयार केलेल्या अहवालाचे प्रकाशन गोऱ्हे यांनी केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पूरप्रश्न सोडविण्यासाठी पटोले व सामंत यांनी पुढाकार घ्यावा. विभाग स्तरावरील बैठकीत या प्रश्नावर सखोल चर्चा होईल. उपायही शोधता येतील. बैठकीला जलविकास तज्ज्ञ राजन इंदुलकर, उदय गायकवाड, विजयकुमार दिवाण, प्रमोद चौगुले, प्रभाकर केंगार, गणेश सांडभोर हेदेखील उपस्थित होते.
पुणे, कोकण विभागीय बैठका होणार
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार पुणे व कोकण विभागीय बैठका होतील. सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच चिपळूण, रत्नागिरीमधील पूरस्थितीवर चर्चा व उपाय यावर विचारमंथन होईल.