मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् संभाजी भिडे यांची बैठक, बंद दाराआड 15 मिनटं चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 07:30 PM2021-08-02T19:30:32+5:302021-08-02T19:35:18+5:30
राज्यात पूर व्यवस्थापनसाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, नद्याजोड उपक्रम याबाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेवूनच विकास कामे केली जातील.
सांगली - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर होते. जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सांगलीतील पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यात चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.
राज्यात पूर व्यवस्थापनसाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, नद्याजोड उपक्रम याबाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेवूनच विकास कामे केली जातील. पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितले. येथील दौऱ्यात संभाजी भिडेंसोबत मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे. या भेटीत बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते.
संभाजी भिडे हे शेजारील भूसंपादन कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तासभर वाट पाहत होते. मुख्यमंत्र्यांनीही भिडे यांना वेळ देत बंद दाराआड तब्बल 15 ते 20 मिनिटे चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही. याबाबत, भिडे यांना माध्यमांनी विचारले असता, त्यांनीही भेटीतील चर्चेबाबत मौन बाळगलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्विन पुल, हरभट रोड येथे भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आढावा बैठक घेतली.