तासगाव नगरपालिकेची सभा मिनिटात गुंडाळली

By Admin | Published: April 1, 2016 11:27 PM2016-04-01T23:27:57+5:302016-04-02T00:02:21+5:30

ये रे माझ्या मागल्या : सव्वा कोटीच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी

The meeting of the Tasgaon Municipal Council was wrapped in the minutes | तासगाव नगरपालिकेची सभा मिनिटात गुंडाळली

तासगाव नगरपालिकेची सभा मिनिटात गुंडाळली

googlenewsNext

तासगाव : तासगाव नगरपालिकेची शुक्रवारी झालेली सभा केवळ एकाच मिनिटात गुंडाळून पालिकेच्या कारभाऱ्यांनी तासगावकरांना एप्रिल फुल केले. ये रे माझ्या मागल्याचा कारभार दाखवून देत कोणतीही चर्चा न करता २५ विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी १ कोटी २२ लाखांच्या २२ कामांच्या निविदा प्रक्रियेसह हागणदारीमुक्त शहरासाठी प्रयत्न करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. तासगाव नगरपालिकेत तीन महिन्यांपूर्वी अपवाद वगळता सभा गुंडाळण्याचा पायंडा होता. मात्र नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील नगराध्यक्ष झाल्यानंतर सभा गुंडाळण्याचा पायंडा खंडीत झाला. तीन सभा सर्व विषयांवर चर्चा होऊनच झाल्या. मात्र शुक्रवारी एक ते पंचवीस विषय सर्वानुमते मंजूर करुन एका मिनिटात सभा गुंडाळण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान मिळते. नगरपालिकेकडून प्रोत्साहन म्हणून पाच हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाते. ९०० लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश शौचालये पूर्ण होत आलेली आहेत. क वर्ग नगरपालिका हागणदारीमुक्त झाल्यास एक कोटीचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी गुडमॉर्निंग पथकासह विविध कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
शहरातील चंदनवली दर्गा, माळी गल्लीतील हनुमान मंदिर, भवानी मंदिर, कापूर ओढ्याजवळील हनुमान मंदिर, यल्लम्मादेवी मंदिर, खाडेवाडीतील विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिरासह अकरा ठिकाणची अनिधकृत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.
राज्य नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहरातील फेरीवाल्यांचे सूक्ष्म सर्वेक्षण करुन शहर फेरीवाला आराखडा तयार करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. तसेच स्मार्ट सिटीच्या धर्तीवर तासगाव शहराचे सर्वेक्षण करुन सूक्ष्म नियोजन करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)

पदोन्नतीचा विषय : नुसतीच कुजबुज
शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सभेत सर्व विषय मंजूर करून सभा गुंडाळण्यात आली. कर्मचारी पदोन्नतीबाबतचा विषयही मंजूर करण्यात आला. दिवाबत्ती विभागामध्ये गट क मध्ये तारतंत्री एक पद मंजूर आहे. या पदासाठी उमेदवार शैक्षणिक पात्रता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा वीजतंत्रीचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा, अशी आहे. या पदासाठी वर्ग चारवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीबाबत अर्ज केला होता. संबंधित कर्मचाऱ्याचा सहा महिन्यांचा विद्युत तारतंत्रीचा कोर्स झाला आहे. त्यांच्या पदोन्नतीबाबतच्या ठरावासाठी काही नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता. तर काही नगरसेवकांच्या या पुढाकाराबाबत कुजबुज सुरू होती. पालिकेच्या सभेत या विषयाला विरोध करण्यासाठी काही नगरसेवकांनी तयारी केली होती. मात्र सभा गुंडाळल्याने पदोन्नतीच्या विषयाची केवळ कुजबुजच राहिली.

Web Title: The meeting of the Tasgaon Municipal Council was wrapped in the minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.