आष्ट्यातील जागेच्या प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:53+5:302021-04-21T04:26:53+5:30
आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरमधील नागरिकांच्या जागेच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक ...
आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरमधील नागरिकांच्या जागेच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आष्टा येथील दत्त वसाहतीत बैठकीवेळी पाटील बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, माणिक शेळके, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
आष्टा येथील गट क्रमांक ४, ६, ९ चा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. दत्त वसाहत, गांधीनगर व साईनगर येथील नागरिकांनी सत्तरच्या दशकापासून येथील प्लॉट खरेदी केले आहेत. खरेदीनंतर सातबारासदरी त्यांची नोंद झाली. नियमितीकरण व एनएदेखील झाले. पालिकेने घर बांधकाम परवानगी दिली. बँकांनी कर्जेही दिली. मात्र काही वर्षापासून या प्लॉटचे खरेदी-विक्री व्यवहार जुन्या अटीचा भंग झाल्याच्या कारणावरून अचानक बंद झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. याबाबत प्रांताधिकारी नागेश पाटील व संबंधित प्लॉटधारकांची बैठक झाली. या बैठकीत नागरिकांनी नियमानुसार दंड भरण्यास मान्यता दिली आहे. मात्र हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मंत्री जयंत पाटील प्रयत्नशील आहेत. त्यांनी नगरसेवक अर्जुन माने, मनीषा जाधव, प्रभाकर जाधव, समीर गायकवाड यांच्यासोबत चर्चा केली व दंडाची रक्कम कमीत कमी भरून हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत सचिवस्तरीय बैठक लवकरच मुंबईत घेण्यात येणार आहे, असे सांगितले.