महापालिकेच्या निधीसाठी लवकरच बैठक
By admin | Published: March 2, 2016 11:27 PM2016-03-02T23:27:11+5:302016-03-03T00:03:35+5:30
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील आढावा बैठकीनंतर होणार अंतिम निर्णय
सांगली : महापालिकेच्या विविध प्रश्नांवर लवकरच मुंबई व सांगली अशा दोन्ही ठिकाणी बैठका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. पुढील महिन्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीत आढावा घेणार आहेत. त्यानंतर विकास निधीबाबत मुंबईत बैठक होईल, असे उपमहापौर विजय घाडगे व नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपमहापौर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक शेखर माने, अनिलभाऊ कुलकर्णी, भाजपच्या नीता केळकर उपस्थित होते. महापालिकेकडे शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्याधिकारी, मुख्य लेखापरीक्षक अशी १९ पदे रिक्त आहेत. या पदाचा कार्यभार पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकारी नसल्याने पालिकेच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. या योजना मार्गी लावण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
एलबीटी रद्द झाल्याने पालिकेची आर्थिक स्थिती संकटात आहे. त्यासाठी महापालिकेला विशेष अनुदान देऊन सहकार्य करावे, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. याबाबत पालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचीही भेट घेतली. त्यांनी पुढील दौऱ्यात पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
काळ्या खणीबाबत पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार
महापालिकेने काळी खण सुशोभिकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ही बाब शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाबाबत लवकरच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.