झाल्या नाहीत बैठका, पण इतिवृत्त तयार!
By admin | Published: January 10, 2015 12:31 AM2015-01-10T00:31:03+5:302015-01-10T00:35:43+5:30
वाळवा पंचायत समिती सभा : रुग्णसेवेचा बोजवारा
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण कल्याण समितीच्या बैठका न होताच त्याचे इतिवृत्त तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवारी) पंचायत समिती सभेत उघड झाला. सभापती रवींद्र बर्डे यांनी या इतिवृत्तांताची सत्यता तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, तालुक्यातील अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे दाखले देण्यासाठी तालुकास्तरावर शिबिर घेण्याची मागणी सदस्यांनी केली.
पंचायत समिती सभागृहात सभापती बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपसभापती भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, राहुल रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर, वाळव्याचे दत्तात्रय शेळके यांच्यासह पॅरिस, पेशावरमधील हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात आली.
आरोग्य विभागाच्या चर्चेवेळी वाळव्याच्या तपश्चर्या पाटील, लालासाहेब अनुसे (बावची) यांनी, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण कल्याण समितीच्या बैठकाच होत नसल्याचा आरोप केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सुतार यांनी, बैठका झाल्याचे इतिवृत्त आपल्याकडे आहे, असे सांगितले. सौ. पाटील यांनी, वाळवा केंद्रात दीड वर्षापासून बैठकच झाली नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यावर सभापती बर्डे यांनी, बैठक न होताच इतिवृत्त कसे तयार झाले अशी विचारणा करुन या इतिवृत्तांताची सत्यता तपासण्याचे आदेश दिले. नेर्ले आरोग्य केंद्रात शिपाई नसल्याची तक्रार सुभाष पाटील यांनी केली. तसेच तेथील बांधकाम का बंद आहे, अशी विचारणा राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद जयकरराव नांगरे— पाटील यांनी केली.
लालासाहेब अनुसे यांनी, बावची येथील शाळेस मुख्याध्यापक आणि शिक्षक नाहीत अशी तक्रार केली. त्यावर गटशिक्षणाधिकारी छायाताई माळी यांनी, मुख्याध्यापकाचे पद मंजूर आहे. मात्र शिक्षक पदास मंजुरी नसल्याचे सांगितले. सुभाष पाटील यांनी, शाळांमधील स्वच्छतेच्या सुविधांवर बोट ठेवले. नळ आहे, पण पाणी नाही, स्वच्छतागृहे वापरायोग्य नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. प्रकाश पाटील यांनी, पेठ शाळेच्या क्रीडांगण विकासासाठी ठराव करुन घेतला.
सौ. माळी यांनी मांडलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार योजनेस बर्डे यांनी मान्यता दिली. प्रकाश पाटील यांनी, पेठनाका बसथांब्यावर सुविधा द्या अशी मागणी केली. पं. स. कार्यालयात विरोधी सदस्यांना स्वतंत्र दालन उपलब्ध करुन द्या असे म्हणताच, सभापती बर्डे यांनी आमचे कक्ष, अंतर्कक्ष सर्वांसाठी खुले असून तेथे बसा, असे सांगितले. (वार्ताहर)
प्रवासी मार्गाचा लिलाव
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे खासगीकरण करणारे विधेयक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवासी मार्गाचा लिलाव निघेल. यामध्ये एसटीवर बेकारीची वेळ येणार आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे बसस्थानक व्यवस्थापक पी. एल. कांबळे यांनी सांगितल्यावर संपूर्ण सभागृहाने त्याला विरोध करण्याची भूमिका जाहीर केली.