झाडांमुळे लांबला सांगलीतील मेगाब्लॉक, पुढील सोमवारी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:25 AM2018-12-17T11:25:40+5:302018-12-17T11:27:49+5:30
उड्डाणपुलाच्या कामासाठी सोमवारी १७ डिसेंबर रोजी होणारा मेगाब्लॉक काही झाडांच्या अडथळ््यांमुळे लांबला आहे. वनविभागाने ही झाडे हटविण्यास परवानगी दिल्यानंतर आता मेगाब्लॉकसाठीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील सोमवारी तो करण्यात येण्याची चिन्हे आहेत.
सांगली : उड्डाणपुलाच्या कामासाठी सोमवारी १७ डिसेंबर रोजी होणारा मेगाब्लॉक काही झाडांच्या अडथळ््यांमुळे लांबला आहे. वनविभागाने ही झाडे हटविण्यास परवानगी दिल्यानंतर आता मेगाब्लॉकसाठीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील सोमवारी तो करण्यात येण्याची चिन्हे आहेत.
रेल्वेच्या नियमानुसार उड्डाणपूल उभारताना संबंधित पुलास कोणत्याही प्रकारचा धोका नसायला हवा. सांगलीतील वारणाली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना पुलाजवळच काही झाडे होती.
भविष्यात ही झाडे पडल्यास किंवा त्यांच्या फांद्या पडून अपघाताचीही चिन्हे होती. त्यामुळे कामाच्या परिक्षणावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना ही बाब जाणवली. त्यांनी तातडीने मेगाब्लॉक रद्द केला. सार्वजनिक बांधकाम विभागास झाडांबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच मेगाब्लॉकला किंवा पुढील कामास परवानगी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाची परवानगी तातडीने घेऊन हे काम मार्गी लावले आहे. त्यामुळे मेगाब्लॉकचा अडथळा आता दूर झाला आहे. येत्या दोन दिवसात बांधकाम विभागामार्फत रेल्वेला याबाबतचे पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील सोमवारी मेगाब्लॉकसाठी परवानगी मागण्यात येणार आहे. त्यास परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.
पुलाच्या कामासाठी सहा तासांचा मेगा ब्लॉक करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित तीस टक्के काम जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन नव्या वर्षात हा पूल सेवेत दाखल होणार आहे.
सांगलीच्या वारणाली रेल्वे गेटमुळे या परिसरातील वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. नागरिकांचे या गेटमुळे हाल होत होते. वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर बनला होता. त्यामुळे याठिकाणी उड्डाण पुलाची मागणी वारंवार होत होती. हे काम साडेचार कोटी रुपयांचे आहे. यातील सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे.
या उड्डाण पुलाच्या कामात अनेक अडथळे आले होते. सुरुवातीला येथील खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी कामात अडथळे आले. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुन्हा रेल्वे ब्लॉक करण्यासाठी आवश्यक परवानगीसाठी अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मध्यंतरी काही काळ हे काम रेंगाळले होते.
अखेर आता हे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावरील फॅब्रिकेशन, स्लॅबचे काम आता गतीने होणार आहे. वारणाली रेल्वे गेटजवळ सहा तासांचे हे काम असल्याने हा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात रेल्वेचे येथील वेळापत्रक बदलण्याची चिन्हे आहेत.