सांगलीच्या कन्येकडे कॅनडाच्या ओंटारियोत अन्न सुरक्षेची जबाबदारी, पहिल्यांदा नाकारला होता व्हिसा
By श्रीनिवास नागे | Published: June 19, 2023 03:37 PM2023-06-19T15:37:08+5:302023-06-19T15:40:10+5:30
कॅनडात काहीसा वर्णभेद असल्याने आपल्याला त्या देशाने व्हिसा नाकारल्याची सल तिच्या मनात होती
कुंडल : रामानंदनगर (ता. पलूस) येथील मेघा वाईंगडे-शिंदे हिने कॅनडामधील ओंटारियो प्रांताच्या कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयात अन्न सुरक्षा निरीक्षकपदी नुकताच पदभार स्वीकारला. लग्नानंतर काहीतरी नवीन करण्याच्या जिद्दीने, कोणत्याही खर्चिक शिक्षणाशिवाय तिने घेतलेली भरारी वाखाणण्याजोगी ठरली आहे.
रामानंदनगर येथील विजय वाईंगडे यांची मोठी मुलगी मेघाचे बारावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्कर विद्यालयात झाले. तिने कोल्हापूर येथील सायबर महाविद्यालयातून फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुण्यातील प्रयोगशाळेत सहा महिने अन्नाच्या नमुन्यांच्या तपासणीचे प्रशिक्षण घेतले. त्याच दरम्यान तिचे लग्न कोल्हापूर येथील रोहन शिंदे यांच्याशी झाले.
पती रोहन मुंबईतील कंपनीत कार्यरत होते; त्याच काळात मेघा तेथील जिममध्ये आहारतज्ज्ञ म्हणून काम करू लागली. सहा महिन्यांनंतर रोहनला कॅनडातील कंपनीत नोकरी मिळाली. मेघाचे शिक्षण अपूर्ण असल्याने तिला कॅनडाला जाणे शक्य नव्हते. पुढे तिने शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तेथील सरकारने व्हिसा नाकारला. यादरम्यान ती कॅनडाची भाषा शिकत तेथील नोकरीच्या शोधात होती. एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर तिला एका कंपनीत नोकरी आणि कामाचा परवानाही मिळाला.
कॅनडात काहीसा वर्णभेद असल्याने आपल्याला त्या देशाने व्हिसा नाकारल्याची सल तिच्या मनात होती. त्यामुळे खासगी नोकरीवर समाधान न मानता तिने काही कोर्सेस करून कॅनडातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. त्यात यश मिळवत ती ५ जून रोजी कॅनडा सरकारच्या अन्न सुरक्षा निरीक्षकपदी रुजू झाली. कोणत्याही तांत्रिक, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी पदवीशिवाय, फूड टेक्नॉलॉजीमधूनही परदेशात उच्च पद मिळू शकते, हे तिने दाखवून दिले.
‘पानकंद’चे घेणार पेटंट
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात असताना मेघाने मगई आणि कलकत्ता पानाच्या टाकाऊ देठांपासून गुलकंदासारखा ‘पानकंद’ हा पदार्थ बनवला. त्यामुळे पानाच्या देठांचाही उपयोग होऊ लागला. त्याला लवकरच पेटंटही मिळेल.
कोणतेही काम लहान नसते. जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. परिस्थिती कोणत्याही यशाच्या आड येत नाही. -मेघा वाईंगडे-शिंदे.