मेघराज बरसले; सर्पराज खवळले!
By Admin | Published: July 26, 2016 11:44 PM2016-07-26T23:44:17+5:302016-07-26T23:44:17+5:30
बालिकेचा मृत्यू : जिल्ह्यात दोन महिन्यांत ४२२ जणांना सर्पदंश
सचिन लाड-- सांगली --मान्सूनचे आगमन झाल्यापासून वातावरणातील बदल व सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्पराज चांगलेच खवळले आहेत. त्यांच्या वारुळात पावसाचे पाणी शिरल्याने सर्प आश्रयासाठी आजू-बाजूच्या घरात जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्याने त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात ४२२ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये गव्हाण (ता. मिरज) येथील एका बालिकेचा मृत्यूही झाला आहे.
उन्हाळा आणि हिवाळ्यात सर्पदंश झाल्याची घटना क्वचितच ऐकायला मिळते. मात्र पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना सातत्याने घडतात. सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे दररोज सहा ते सात रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठ दिवसांत हा आकडा वाढला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णास उपचारार्थ तातडीने दाखल केले जाते. डॉक्टर प्रथम त्या रुग्णास अतिदक्षता विभागात हलवितात. विषारी आणि बिनविषारी असे सर्प असतात. रुग्णास कोणत्या सर्पाचा दंश झाला आहे, असे कोणालाच समजत नाही. काहीवेळेला डॉक्टरांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी संबंधित सर्पास पकडून डॉक्टरांकडे घेऊन येतात. या प्रकाराने डॉक्टरही घाबरुन जातात. त्यांना सर्प कोणत्या जातीचा आहे, हे समजत नाही. सर्पदंश रुग्णावर चार-पाच तास देखरेख ठेवली जाते. यादरम्यान त्याच्या प्रकृतीने उपचारास प्रतिसाद दिला तर, धोका टळला असल्याचे मानले जाते.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरू आहे. तत्पूर्वी मान्सूनचे नुसते आगमन झाले होते. हवामानात बदल झाला होता. गारवा आणि ओलाव्यामुळे सर्प स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वारुळातून बाहेर पडत आहेत. ते आश्रय घेण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करीत आहेत. घरातील तुळीवर, पोटमाळ्यावर, उकळामध्ये, धान्य पोत्यांच्या ढिगात, तिजोरी यासह मिळेल त्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन बसत आहेत.
घरातील व्यक्ती याठिकाणी कामानिमित्त गेल्यास सर्पराज भीतीने त्यांना दंश करीत आहेत. अनेकदा रुग्णास काय दंश झाला आहे, हे समजत नाही. अज्ञात विषारी दंशाच्या संशयानेच त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या दोन महिन्यात शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयात सर्पदंशाने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ४२२ पर्यंत गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.
उपचाराचा खर्च महागडा
सर्पदंश झालेल्या रुग्णाची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोलिस केस बनविली जाते. यामुळे या रुग्णावर मोफत उपचार केले जात आहेत. केस झाल्यामुळे पोलिसांकडून रुग्णाचा जबाब नोंदवून घेतला जातो. त्याने सर्पदंशच झाल्याचे सांगितले तर, केस फाईल बंद केली जाते. रुग्णावरील उपचाराचा खर्चही महागडा आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाला तर, किमान पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च येतो, असे एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.