आयुक्तांविरोधात सदस्यांची आगपाखड

By admin | Published: January 11, 2017 11:42 PM2017-01-11T23:42:44+5:302017-01-11T23:42:44+5:30

महापालिका आढावा बैठक : दोन दिवसांमध्ये फायलींच्या निपटाऱ्यांचे खेबूडकरांचे आश्वासन

Members of the Commission against the Commissioner | आयुक्तांविरोधात सदस्यांची आगपाखड

आयुक्तांविरोधात सदस्यांची आगपाखड

Next

सांगली : प्रलंबित पडलेल्या अडीचशेहून अधिक कामांच्या फायलींवरून महापालिका पदाधिकारी आणि सदस्यांनी बुधवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यावर आगपाखड केली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनीही जनतेची कामे मार्गी लावण्याची सूचना दिल्यानंतर, दोन दिवसात फायलींचा निपटारा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
महापालिकेच्या प्रलंबित विकास कामांबाबत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी स्थायी समिती सभागृहात बुधवारी आढावा बैठक घेतली. महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, गटनेते किशोर जामदार यांच्यासह नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेवकांनी आयुक्तांबद्दल तक्रारी सुरू केल्या. महापौर म्हणाले की, महापालिकेचे अधिकारी काम व्यवस्थित करीत नसल्याचे कारण आयुक्त वारंवार देत आहेत. अधिकारी जर काम करीत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही?, असा सवालही त्यांनी केला. यापुढे अधिकाऱ्यांवर खापर फोडण्यापेक्षा, सर्व विभाग प्रमुखांना एकत्रित करून फायलींमधील दुरुस्त्या तातडीने करून त्यांचा निपटारा करावा. नागरिकांच्या बांधकाम परवाना व परिपूर्तता प्रमाणपत्राच्या फायलीही अडविण्यात येत आहेत. ही तुमची कार्यपद्धती बरोबर नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पालिकेची निवडणूक दीड वर्षावर आली आहे. गेल्या वर्षभरात प्रभागात नगरसेवक काहीही काम करू शकलेले नाहीत. सुचविलेल्या विकास कामांच्या फायली मंजुरीसाठी सात ते आठ महिने धूळ खात पडल्या आहेत. फायलींवर केवळ शेरेबाजी सुरु आहे. २५ लाखांच्या बायनेम कामांच्या फायलीही आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. नागरिक नगरसेवकांना आणि नगरसेवक महापौर या नात्याने मला या गोष्टीचा जाब विचारत आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल पाहून तरी आयुक्तांनी काम करावे, असे ते म्हणाले.
यावर आयुक्त खेबूडकर यांनी, फायली विहित पद्धतीने होत नसल्याचे कारण स्पष्ट केले. त्यावर नगरसेवकांनी आयुक्तांचा हा खुलासा अमान्य केला. फायली जर व्यवस्थित नसतील, तर अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना आयुक्तांनीच द्यायला हव्यात. त्यांच्यात सुधारणा घडवून, लोकांची कामे मार्गी लावण्याची जबाबदारी ही आयुक्तांची आहे, असे मत नगरसेवकांनी मांडल्यानंतर, दोन दिवसात फायलींचा निपटारा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.
तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत आयुक्तांविरोधात नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. आयुक्तांनी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतरच नगरसेवक शांत झाले. (प्रतिनिधी)
कामे मार्गी लावा : जयश्रीतार्इंकडून सूचना
बैठकीत जयश्रीताई म्हणाल्या की, मागील बैठकीवेळी आयुक्त नवीन होते. त्यामुळे त्यांना थोडा वेळ दिला होता. आता बराच कालावधी झाला आहे. आयुक्तांबद्दल नगरसेवकांची नाराजी वाढत आहे. त्यामुळे आयुक्तांनी नगरसेवकांसाठी नव्हे, तर जनतेसाठी कामे करावीत. बेकायदेशीर कामांचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही. तशी गोष्ट असल्यास आयुक्तांनी ती निदर्शनास आणावी. पुढील बैठकीत तक्रार करणारे नगरसेवक आयुक्तांचे कौतुक करताना दिसावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Members of the Commission against the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.