सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

By admin | Published: May 29, 2017 11:14 PM2017-05-29T23:14:40+5:302017-05-29T23:14:40+5:30

सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

Members of the Green Signal to 'Dutt India' | सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

सभासदांचाही ‘दत्त इंडिया’ला ग्रीन सिग्नल

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सोमवारी कारखान्याच्या विशेष सभेत एकमताने ठराव करत, मुंबईच्या श्री दत्त इंडिया कंपनीला कारखाना चालविण्यास हिरवा कंदील दर्शविला. त्यामुळे आता कंपनीसोबतच्या करारपत्राचा मार्ग मोकळा झाला आहे.
वसंतदादा कारखाना परिसरातील सभागृहात विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभा पार पडली. सभेस सभासदांचीही मोठी उपस्थिती होती. वादविवादाची किरकोळ घटना वगळता सभा शांततेत पार पडली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात एकाही सभासदाने विरोध दर्शविला नाही. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्ष पाटील यांनी सभासदांना सूचना मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर १५ सभासदांनी सूचना मांडल्या. या सर्व सूचना कामगार, शेतकरी, सभासद यांच्या थकीत देय रकमेबद्दलच्याच होत्या. कंपनीच्या कारभारावर संचालक मंडळाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही सभासदांनी केली.
कवठेपिरानचे चंद्रशेखर बुटाले म्हणाले की, कामगारांचे पगार थकीत राहणे हा कारखान्याचा अपमान आहे. त्यामुळे शेतकरी, सभासदांची देणी भागविताना प्राधान्याने कामगारांचीही देणी द्यावीत. कारखान्याशी संबंधित संस्थांचे हिशेब सभासदांपुढे कधीच येत नाहीत. त्यामुळे ते हिशेब पुढील सभेत सादर करावेत.
अंकलखोपचे अनिल पाटील म्हणाले की, कंपनी कशापद्धतीने देणी देणार आहे, याचा खुलासा सभासदांसमोर केला पाहिजे.
बुधगावचे दिनकर पाटील यांनी, सभासदांची देणी व्याजासहीत देण्यात यावीत, अशी मागणी केली. कारखान्याचे उपप्रकल्पही भाडेतत्त्वावर द्यावेत, भाडेकराराचा मसुदा सर्व सभासदांसाठी उपलब्ध करावा, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या.
कामगार संघटनेचे नेते प्रदीप शिंदे म्हणाले की, आमची संघटना नोंदणीकृत अधिकृत संघटना असल्याने या संघटनेशी कंपनीने कामगारांबाबतचा करार केला पाहिजे.
सांगलीवाडीचे प्रभाकर पाटील म्हणाले की, आजपर्यंत कधीच कारखान्याचे इतिवृत्त पाहायला मिळाले नाही. हा प्रकार कारखान्यापासून मंत्रालयापर्यंत सारखाच आहे. त्यामुळे रितसर सभेचे इतिवृत्त लिहावे आणि कारभारात पारदर्शकता ठेवावी. सहकार कायद्याप्रमाणे कारखाना, संचालक, सभासदांचे हक्क अबाधित ठेवावेत.
सभासदांच्या प्रश्नांना विशाल पाटील यांनी उत्तरे दिली. त्यानंतर ठराव मंजुरीच्या घोषणा देऊन सभा संपविण्यात आली. भास्कर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, डी. के. पाटील, अनिल पाटील, विक्रम पाटील-सावर्डेकर, शिवाजीराव पाटील, भास्कर पाटील, जिनेश्वर पाटील, रणजितसिंह पाटील आदी उपस्थित होते.
विशाल पाटील, तुमच्यावर विश्वास नाही!
सांगलीचे अनिल शिंदे यांनी विशाल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, तुम्ही बोगस धनादेश देऊन शेतकऱ्यांना फसवता. विशाल पाटील यास जबाबदार आहेत. त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तुम्हा संचालकांवर ८८ अंतर्गत कारवाई का होत नाही? असेही ते म्हणाले. त्यांच्या आरोपानंतर सभेतील वातावरण तापले. काही सभासदांनी त्यांचे भाषण बंद करण्याची मागणी केली, तर विशाल पाटील यांनी शिंदे यांच्यावर स्टंटबाजीचा आरोप केला. त्यामुळे थोडी वादावादी आणि तणाव निर्माण झाला.
करारपत्रानंतर आठ दिवसात पैसे
विशाल पाटील म्हणाले की, श्री दत्त इंडिया कंपनीबरोबर करार झाल्यानंतर आठ दिवसात थकीत ऊसबिलाच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कामगारांशीही कंपनीने करार करावा, असे आम्ही नमूद केले आहे. ही कंपनी म्हणजे देशातील नामांकित साखर व्यापार करणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जादा दराची अपेक्षा पूर्ण होईल, मात्र सभासदांची जबाबदारी वाढली आहे. सभासद जितका ज्यादा ऊस कारखान्यास देतील, तेवढे जादा भाडे आपणास मिळणार आहे. त्यामुळे सभासदांनी जादा ऊस द्यावा.
हा तर दु:खद निर्णय...
आष्ट्यातील भूपाल खोत म्हणाले की, कारखाना चालवायला न देण्याच्या बाजूचे आम्ही आहोत. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हा कारखाना चालविण्यास देण्याची वेळ यावी, हा एक दु:खद निर्णय आहे.

Web Title: Members of the Green Signal to 'Dutt India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.