दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सभेत सभासदांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:52 PM2019-07-01T14:52:25+5:302019-07-01T14:53:28+5:30
दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ लाख रुपयांच्या उधळपट्टीवरून सभासदांनी संताप व्यक्त केला.
सांगली : दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ लाख रुपयांच्या उधळपट्टीवरून सभासदांनी संताप व्यक्त केला.
येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात रविवारी सोसायटीच्या १0७ व्या वार्षिक सभेसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून सभासद उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष जाकीरहुसेन मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विषयपत्रिकेनुसार कामकाज सुरू झाले आणि नफातोटा पत्रक वाचनावेळी विरोधी गटाचे बजरंग कदम यांनी सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील उधळपट्टीचा विषय उपस्थित केला.
गरज नसताना येथील नूतनीकरणासाठी ४३ लाख ६८ हजार रुपये मंडळाने खर्च केले. इतका खर्च करण्याची काय गरज होती, अशी विचारणा करीत, सभासदांच्या पैशाच्या उधळपट्टीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावरून सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या या मुद्यास विरोध केला. सदस्यांत गोंधळ सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळातच नफातोटापत्रक वाचन करून मंजुरी देण्यात आली.
सभासदाचा मृत्यू झाल्यास भाग, कायमठेव, जीवनरक्षक ठेवी व देय रकमा वजा करून शिल्लक कर्जाची परतफेड रिझर्व्ह फंडातून करण्याची पोटनियमातील दुरूस्ती सभेसमोर ठेवण्यात आली. कदम व डी.जी. मुलाणी यांनी त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे जुनाच पोटनियम ठेवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. सभासदाला आजारावर उपचारासाठी कल्याण निधीतून वर्षात एकदाच मदत देण्यास मंजुरी दिली. परंतु सेवानिवृत्तांचा देखील समावेश यामध्ये करण्याची मागणी डी. जी. मुलाणी यांनी केली. यासंदर्भात एक अभ्यास गट नियुक्त केला जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले. प्रत्येक सभासदाची मासिक वर्गणी एक हजार रुपये करण्यास बजरंग कदम यांनी विरोध दर्शविला. वर्गणी पाचशे रुपये करावी, अशी मागणी सभासदांनी केली.
कदम यांनी विविध विषयांवर एकामागोमाग एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांनी अंतर्गत लेखापरीक्षक नियुक्ती, क्रीडा व विविध स्पर्धांवरील झालेला खर्च अशा विषयांवर हरकत घेतली. यावर संतप्त झालेल्या सत्ताधारी मंडळींनी, एकाला एकच प्रश्न विचारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावरूनही पुन्हा गोंधळ निर्माण झाला. सभेच्या पीठासनापर्यंत येऊन सदस्यांनी यावरून संताप व्यक्त करीत गोंधळातच सर्व विषय मंजूर केले. यावेळी उपाध्यक्ष शक्ती दबडे, सर्व संचालक, सचिव वसंत खांबे आदी उपस्थित होते.