आबांच्या स्मारकाचे काम पीडब्ल्यूडीकडे

By admin | Published: May 9, 2017 01:16 AM2017-05-09T01:16:09+5:302017-05-09T01:16:09+5:30

आबांच्या स्मारकाचे काम पीडब्ल्यूडीकडे

The memorial work of PWD | आबांच्या स्मारकाचे काम पीडब्ल्यूडीकडे

आबांच्या स्मारकाचे काम पीडब्ल्यूडीकडे

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगलीतील स्मारकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले २ कोटी ८७ लाख रुपये वर्ग करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले.
सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृहाच्या आवारात आर. आर. आबांचे स्मारक होणार आहे. अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. जिल्हा परिषदेकडे यासाठी २ कोटी ८७ लाख रुपये आले आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. जे. साळुंखे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला.
वास्तुविशारद नेमण्यापासून निविदा प्रक्रियेपर्यंतच्या कोणत्याही प्रक्रियेस अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे काम नेमके करायचे कोण, याबाबत संभ्रम होता. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, हे काम नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्यावे लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा. निधी वर्ग झाल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी गतीने काम करावे, अशी सूचना त्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत होकार दर्शविला.
स्मारकाची उभारणी करताना वसतिगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीचा विषयही उपस्थित झाला. वसतिगृहाचीही दुरवस्था झाली आहे. स्वच्छता आणि सेवा-सुविधांचा अभाव असून, इमारतीच्या दुरुस्तीचीही गरज असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. स्मारकाचे काम सुरू होत असताना, जिल्हा परिषदेने त्यांच्या निधीतून वसतिगृहाची इमारत दुरुस्त करून सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृहाची इमारतही स्मारकाला साजेशी व्हावी, असे ते म्हणाले.
आबांच्या खोलीबाहेर माहितीफलक
वसतिगृहात ज्या खोलीत आर. आर. आबांनी वास्तव्य केले, त्या खोलीबाहेर त्यांचा माहितीफलक लावण्याचा निर्णयही यापूर्वी झाला आहे. वसतिगृहाची इमारत सुधारण्यात आल्यानंतर आबांच्या खोलीबाहेर फलक लावण्यात येणार आहे.
निधी टप्प्या-टप्प्याने मिळणार
सध्या प्राप्त झालेला २ कोटी ८७ लाखांचा निधी खर्च केल्यानंतर राज्य शासनाकडून टप्प्या-टप्प्याने स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधी प्राप्त होणार आहे.

Web Title: The memorial work of PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.