मानसिक आरोग्य दिन विशेष; विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेची मोहीम
By संतोष भिसे | Published: October 9, 2022 09:49 PM2022-10-09T21:49:32+5:302022-10-09T21:50:50+5:30
मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.
सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल अपरिहार्य बनला. पण तोच आता पालकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.
सोमवारी मानसिक आरोग्य दिनी मोहिमेची सुरुवात होईल. माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाईलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. यातून मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची निश्चित संख्या व व्यसनाचे गांभीर्य स्पष्ट होणार आहे.
मोबाईलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाईल. शिक्षक प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, जनजागृती आदी उपक्रम वर्षभर राबविले जातील. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चाैगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, माधुरी गुरव, पोपट मलगुंडे, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, मानसतज्ज्ञ क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील, सूरज कदम, प्रियांका सरतापे, वसुंधरा पाटील, कालिदास पाटील यांचा सहभाग असेल.
याच्या होतील नोंदी -
- मुलांचा मोबाईलमध्ये जाणारा वेळ
- पाहिली जाणारी संकेतस्थळे
- अभ्यासाव्यतिरिक्त होणारा वापर
- कार्टून, मनोरंजन, संशोधन व आक्षेपार्ह माहितीसाठी वापर
- मोबाईल वापरात पालकांचा होणारा हस्तक्षेप
- मोबाईल बंद केल्यास वागणुकीत होणारे बदल
८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा -
कालिदास पाटील यांच्या ‘सुश्रुषा’ संस्थेने जिल्ह्यातील १५ वर्षांपर्यतच्या ८ हजार ८९२ मुला-मुलींचे मोबाईलच्या दृष्टीने मानसशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यातून ८५ टक्के मुलांत चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये टोकाचा संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये अतिचंचलता आढळली.
पालकांनी मुलांच्या वर्तनाकडे व भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. कोणत्याही अंधश्रध्देच्या आहारी न जाता मानसतज्ज्ञांची मदत घ्यावी.
- सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी
मुलांच्या मनावर झालेला परिणाम शारीरिक अस्वस्थतेतून दिसून येतो. मुले शब्दांतून, बोलण्यातून व्यक्त होतीलच असे नाही. त्यामुळेच त्यांच्या मानसिकतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- कालिदास पाटील, सचिव, मराठी मानसशास्त्र परिषद, पुणे
शिक्षण व्यवस्थेते मुलांच्या मानसिक व भावनिक विकासाला महत्व द्यायला हवे. ऑनलाईन शिक्षणातून डोक्यात केवळ माहितीचा साठा वाढवू नये. कुटुंबात व शाळेत मुलांचे भावनिक विश्व जपल्यास आत्महत्या व गुन्हेगारी कमी होईल.
- डॉ. संदीप शिसोदे, अध्यक्ष, राज्य मानसतज्ज्ञ असोसिएशन