मनोरुग्ण महिलेला मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:52+5:302021-04-23T04:27:52+5:30
सुरेंद्र शिराळकर आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आरग (ता. मिरज) येथील ...
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आरग (ता. मिरज) येथील तानूबाई मोहिते या मनोरूग्ण महिलेला हक्काचे घर मिळणार आहे.
शिंदे यांना १५ डिसेंबर २०१९ रोजी नागजनजीक २० किलोमीटर अंतरावरील अंकले गावात मनोरुग्ण महिला सापडल्याचे समजले. दीपक माने व त्यांच्या सौभाग्यवतींनी सुनील शिंदे यांना माहिती दिल्यानंतर ‘त्या’ आजींना मुस्तफा मुजावर व मित्र रमेश खोत, दीपक पाटील (कारंदवाडी) या सर्वांनी मिळून रत्नागिरी येथील माहेर संस्थेत पाठवले. या संस्थेमार्फत प्रादेशिक मनोरुग्णालय येथे औषधोपचार करण्यात आले. साधारण कन्नड भाषेत बोलत असलेली ही आजी दोन वर्ष रत्नागिरीमध्ये औषधोपचार घेत होती.
तिच्याकडून औषधोपचारांना प्रतिसाद मिळाला. तिला नाव, गाव आठवू लागले. अचानक मनोरुग्णालयातील सुनील कांबळे यांचा फोन आला व त्यांनी आजीचे नाव तानूबाई मोहिते असल्याचे सांगितले. त्या आरग येथील पत्ता सांगत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर सुनील शिंदे यांनी आरग येथील नातेवाईक अशोकराव तांदळवाडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना नाव, फोटो व्हाॅट्सअपवर पाठवला. थोड्या वेळातच समजले की, त्या आरग येथील आहेत, त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. ही आजी सध्या अथणी (नांदगाव) येथे राहात होती. त्यांना मुलगा व मुलगी आहे. आठ-दहा वर्ष झाली, ही आजी घरातून बाहेर आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला मुलाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तिला तिच्या हक्काचे घर मिळणार आहे.
चौकट:
सुनील शिंदे यांना मनोरुग्णांची माहिती मिळाल्यानंतर ते त्यांना स्नान घालून स्वच्छता करून रत्नागिरी येथील माहेर संस्थेच्या स्वाधीन करतात. या संस्थेच्या माध्यमातून उपचार होत असल्याने अनेक मनोरुग्ण आता त्यांच्या कुटुंबासोबत राहात आहेत.