व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:22 PM2017-07-23T23:22:18+5:302017-07-23T23:22:18+5:30
व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील हार्डवेअर व्यापारी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. पोलिसांचा तपास थंडावला असल्याचे चित्र आहे. मृतदेहाचा कमरेपासून खालील भाग व शीर सापडल्याने मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर रस्त्यावरील शत्रुंजयनगरसमोरील उसाच्या शेतात शहा यांचा कमरेपासून खालील भाग सापडला होता. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली होती. दुसऱ्यादिवशी त्यांचे शीर सापडले होते. घटनास्थळी विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मृतदेहाची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. पण डॉक्टरांना मृत्यूचे कारण निश्चित करता आले नाही. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. शहा यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले नाही.
घटनास्थळी विषारी द्रव्याच्या बाटलीला टोपण घातलेले होते. विष प्राशन करणारी व्यक्ती बाटलीला टोपण कसे घालेल? तसेच बाटली तशीच फेकून कशी देईल? अशी चर्चा असल्याने मृत्यूबाबत गूढ कायम आहे.
अभय शहा ८ जुलैपासून बेपत्ता झाले होते. त्यादिवशी ते कोल्हापूरला रुग्णालयात व देवदर्शनाला गेल्याचे पुरावे मिळाले आहेत. शत्रुंजयनगरसमोरील कमानीजवळ त्यांची दुचाकी दुसऱ्यादिवशी नातेवाईकांना सापडली; पण या परिसरात नातेवाईक व पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्य रस्त्यापासून मृतदेह मिळालेले ठिकाण फार लांब आहे. असे असतानाच शहा तिथेपर्यंत चालत का गेले? दुचाकी घेऊन का गेले नाहीत? अशीही चर्चा आहे.
अहवालाकडे लक्ष
शहा यांचा विच्छेदन तपासणीचा अंतिम अहवाल अजूनही प्राप्त न झाल्याने पोलिसांचा तपास थंडावला आहे. याप्रकरणी नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांच्याकडूनही ठोस माहिती मिळाली नाही. शहा यांच्या शरीराचे काही अवशेष अजूनही सापडले नाहीत. तीन-चार दिवस पोलिसांनी शोध घेतला.