सांगली जिल्ह्याचा पारा गेला ४१ अंश सेल्सिअसवर
By admin | Published: April 11, 2017 12:18 AM2017-04-11T00:18:27+5:302017-04-11T00:18:27+5:30
जिल्हा तापला : तापमानात वाढ होण्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज; शहरातील मुख्य रस्त्यांवर अघोषित संचारबंदीचे चित्र
सांगली : जिल्ह्याच्या तापमानात सोमवारी अचानक वाढ होऊन पारा ४१ अंशांवर गेला आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, किमान तापमानातही वाढ होत आहे.
सांगली जिल्ह्याच्या तापमानात यंदा विक्रमी नोंदीची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिल महिन्यातील आजवरच्या सरासरी तापमानापेक्षा सोमवारी नोंदले गेलेले तापमान ३ अंश सेल्सिअसने अधिक आहे. १९७३ मध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आजपर्यंत हा विक्रम अबाधित आहे. या विक्रमाच्या जवळपास पारा घुटमळत असल्याने, वाढलेल्या तापमानाची चिंता आता सतावत आहे.
सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यातही अधिक तापमानाची नोंद झाली होती. एप्रिल आणि मे महिन्यातील तापमानाला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे सांगलीसह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर अघोषित संचारबंदीसारखे चित्र दिसू लागले आहे. उन्हापासून बचावासाठी विविध उपाय नागरिकांकडून केले जात आहेत. सोमवारी कमाल तापमान ४१ अंश नोंदले गेले असून, किमान तापमान २३ अंशावर गेले आहे. १६ एप्रिलपर्यंतच्या तापमानाचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान खात्याने पारा चाळीसच्या आसपासच घुटमळणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काही दिवसात आकाश निरभ्र राहणार असून, पावसाचीही शक्यता नसल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वाऱ्याचा वेगही आता मंदावल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामानविषयक विविध संकेतस्थळांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सोमवारी वाऱ्याचा वेग प्रतितास दहा किलोमीटर इतका नोंदला गेला आहे.
एप्रिलमधील आजवरचे विक्रम...
तारीखतापमान
१४ एप्रिल १९७३४३
१६ एप्रिल २0१६४२.७
१0 एप्रिल २0१३४२.४
२७ एप्रिल २00७४१.३