सांगलीत शाही थाटात संस्थानच्या गणपतीला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 07:12 PM2017-08-29T19:12:16+5:302017-08-29T19:19:14+5:30
सांगली : पावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्साहवर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि ह्यगणपतीबाप्पा मोरयाऽऽह्णचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला मंगळवारी शाही थाटात निरोप देण्यात आला.
सांगली : पावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्साह वर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि गणपतीबाप्पा मोरयाऽऽचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला मंगळवारी शाही थाटात निरोप देण्यात आला.
श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये श्रींची आरती करण्यात आली. श्रींची विधिवत पूजा झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये पान-सुपारीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, शेखर माने, बजरंग पाटील, अनिल पाटील-सावर्डेकर, समित कदम उपस्थित होते. पान-सुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, तसेच ढोल-ताशा व ध्वजपथक, मुलींचे लेझीम पथक, हलगी पथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बँड सहभागी झाला होता. रथयात्रेचा मार्ग रांगोळ्यांनी रेखाटला होता.
दुपारी सव्वाचारला रथयात्रा राजवाडा चौकात आली. तेथे काहीकाळ ती थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण करण्यात येत होती.
गणपती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर भाविकांनी मोठा जयघोष केला. त्यानंतर टिळक चौकमार्गे मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ अशा जयघोषात श्रींची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
पावसाचे आगमन
रथयात्रा राजवाडा चौकात आल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे भाविकांची धावपळ झाली. मिरवणुकीतील पथकांनी मात्र जागा सोडली नाही. भाविकांनी भर पावसात भिजत मिरवणुकीचा काहींनी लुटला. दहा मिनिटे पाऊस सुरू होता.