चित्रपटांत नकारात्मकता मांडण्याची पध्दत भीषण : सचिन खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:48 PM2018-08-04T23:48:10+5:302018-08-04T23:54:55+5:30

चित्रपट निर्मितीसाठी अनेक सुंदर आणि लोकांवर चांगला परिणाम करणारे विषय आहेत. तरीही मुंबई गॅँगवॉर, मन्या सुर्वे आणि इतर नको त्या विषयांवर अधिक प्रभावीपणे चित्रपट बनविले जात आहेत.

The method of denying negativity is horrific: Sachin Khedekar | चित्रपटांत नकारात्मकता मांडण्याची पध्दत भीषण : सचिन खेडेकर

चित्रपटांत नकारात्मकता मांडण्याची पध्दत भीषण : सचिन खेडेकर

Next
ठळक मुद्देसंस्कार भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत कार्यक्रम; सचिन कानिटकरांनी रंगविला गप्पांचा फड

सांगली : चित्रपट निर्मितीसाठी अनेक सुंदर आणि लोकांवर चांगला परिणाम करणारे विषय आहेत. तरीही मुंबई गॅँगवॉर, मन्या सुर्वे आणि इतर नको त्या विषयांवर अधिक प्रभावीपणे चित्रपट बनविले जात आहेत. नकारात्मक गोष्टी अत्यंत चकचकीतपणे जोरात बिंबविण्याची ही पध्दत भीषण असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी शनिवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले.

संस्कार भारती, शाखा सांगलीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण व खेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सचिन कानिटकर यांनी अनेक खुमासदार प्रश्न विचारून मुलाखतीची रंगत वाढविली.

खेडेकर म्हणाले की, धंदेवाईक गणिते मांडून हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. अनेक नितांत सुंदर विषय असतानाही अलीकडे नकारात्मक गोष्टींवरीलच अधिक चित्रपट येत आहेत. खलनायकाची भूमिका करताना एकवेळ अभिनयाचा कस लागतो मात्र, अशा भूमिका व्दिधा मनस्थितीत टाकतात. आताचा ओढा पाहिला तर अशा माणसांना अधिक प्रसिध्द बनविण्याचाच प्रयत्न चालू आहे. सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली वाईट गोष्ट सर्वमान्य करण्याचा हा प्रयत्न आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊनही अभिनय क्षेत्रात उतरण्यासाठी घरचा पाठिंबा महत्त्वाचा होता. मनोरंजनातून सांगितलेली कोणतीही गोष्ट अधिक टिकते त्यामुळे अभिनय करत असताना त्याचा माणसांवर परिणाम व्हावा, त्यांच्यात बदल व्हावा, ही अपेक्षा असते. कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसल्याने डॉ. श्रीराम लागूंसारखे, पंकज कपूर आणि अमिताभ बच्चनसारखे काम करावे, ही इच्छा होती. या कलाकारांनी आपल्यातील बाळ जिवंत ठेवल्यानेच असा नैसर्गिक अभिनय करता येतो. कलाकाराला आपल्यातील दुय्यमत्व मानता आले पाहिजे.

आपण म्हणजे स्वयंभू ही वृत्ती चुकीची असून, नट स्वत: काही घडवत नसून, अभिनय फुलण्यासाठी दमदार लेखन कारणीभूत ठरत असते. आपल्यात ‘रोलमॉडेल’ कमी असल्याने कलाकार अभिनयापेक्षा बाहेरचे काय बोलतात, याकडे सर्वांचे जास्त लक्ष असल्याचेही ते म्हणाले. यावेळी इंदिराबाई खाडिलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरूवर्य मटंगेबुवा पुरस्काराने गायक अमोल पटवर्धन, तर सारंगीवादक महंमद हनिफ मुल्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साथीदार पुरस्काराने श्रीराम हसबनीस यांना गौरविण्यात आले. सतीश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, डॉ. व्यंकटेश जंबगी, मिलिंद महाबळ, संतोष बापट, कल्याणी गाडगीळ, भालचंद्र चितळे, यशोधन गडकरी, जयदीप शिराळकर आदी उपस्थित होते.

टीव्ही-सिनेमात फरक
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या ‘जिवासखा’ या चित्रपटातून पदार्पण केले. यावेळी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवली आहे. सिनेमामध्ये सहा फुटाचा माणूस साठ फूट दिसतो, तर टीव्हीवर सहा फुटाचा माणूस सहा इंच दिसतो. त्यामुळे टीव्हीवरील काम नव्हे तर सिनेमातील काम फार काळ लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे सिनेमाला प्राधान्य दिल्याचे खेडेकर यांनी सांगितले.

कस न लागणाऱ्या दूरदर्शन मालिका
खेडेकर म्हणाले की, कशाचाच कस लागणार नाही, अशी व्यवस्था सध्याच्या दूरदर्शन मालिकांमध्ये असते. माणूस म्हणून आपण वाढत असताना तोच तो रोल दररोज करण्याने अवघडल्यासारखे होते. दूरदर्शनवरील मालिकांमुळे मला देशभर ओळख दिली असली तरी, आताचे वास्तव वेगळे आहे.

Web Title: The method of denying negativity is horrific: Sachin Khedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.