म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाचा साथीदार धीरज सुरवशेंच्या कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 05:14 PM2022-07-08T17:14:17+5:302022-07-08T17:14:38+5:30
बागवान याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे (सोलापूर) याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील हत्याकांड प्रकरणात मांत्रिक अब्बास बागवान याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे (सोलापूर) याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली. या प्रकरणी मांत्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू आहे.
अधिक माहिती अशी, की डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान याने ते शोधून देतो,’ असे सांगून वेळोवेळी त्याने पैसे उकळले होते. अखेर गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यावेळी मांत्रिकाने सुरवशेच्या मदतीने कुटुंबाचा काटा काढण्याचे ठरविले.
मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे १९ जूनला सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दाम्पत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्यावेळी विषाच्या गोळ्या मांत्रिकाने आणल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास पोपट वनमोरे यांचे कुटुंब संपविले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास डॉ. माणिक यांचे कुटुंब संपवून मांत्रिक आणि साथीदार पसार झाले होते.
त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सुरवशे याच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्याला ११ जुलैपर्यंत वाढीव कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, मांत्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू आहे. पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करीत आहे.