म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

By admin | Published: February 9, 2016 12:12 AM2016-02-09T00:12:53+5:302016-02-09T00:15:24+5:30

पाणीपट्टीबाबत विचार करण्याची गरज : मिरज तालुक्यात राजकीय समन्वयाचा अभाव

Mhasal Lift Irrigation Scheme is in the grip of uncertainty | म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

Next

अमोल शिंदे -- एरंडोली --म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. म्हणून पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकरी टाळाटाळ का करतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
दुष्काळाचा कलंक किमान मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यावरून पुसण्यातील म्हैसाळ योजनेचे योगदान कोणीही नाकारणार नाही. वसंतदादा पाटील व विठ्ठल दाजी पाटील यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात साकारत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी आणला. तासगाव, कवठेमहांकाळ मतदार संघाच्या रचनेनंतर आर. आर. आबा यांनी म्हैसाळ योजनेतून नियमित पाणी सोडण्याबाबत दक्षता घेतली. जिल्ह्याच्या राजकारणात गेली २५ वर्षे महत्त्वाचा भाग असणारी ही योजना, आजही अनिश्चिततेत अडकली आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप या सत्ताधारी नेत्यांवर आता ही योजना नियमित चालविण्याची जबाबदारी आली आहे. पण नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. म्हैसाळ योजनेच्या पुढील कामासाठी ३२ कोटी मंजूर झाले. पण हजारो कोटी खर्चून निर्माण झालेली ही योजना, पाणीपट्टी भरली नाही म्हणून बंद आहे. सध्या ऐन थंडीतच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, तर येणारा उन्हाळा किती भीषण असेल, याच चिंतेत शेतकरी आहेत. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी नाही, या भाजप सरकारच्या भूमिकेने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. संकाटात असलेला शेतकरी व पशुधन वाचविणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मोठ्या उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज सरकार देते, पण शेतकऱ्यांना मात्र मदत देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे सक्तीने वसूल करत आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा म्हणणारे, आज सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना हे आपले सरकार वाटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावाच नाही
पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्यावरून नेहमीच आग्रह धरला जातो. पाणी एकदा आले की परत याचा पाठपुरावा ‘पाटबंधारे’च्या कृतिशील कर्मचाऱ्यांकडून होत नाही, असा शेतकऱ्यांना असलेला पूर्वानुभव हाच पाणीपट्टी वसुलीतील सर्वोच्च अडसर ठरतोय.
प्रत्येक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी पेटत असून, पाणी तर येणारच, पण जितका वेळ त्याला होणार आहे, तितके अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. पाण्यासाठी आंदोलनात पुरोगामी संघटना, कर्नल सुधीर सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख हे नेते पुढे येत असताना, आमदार सुमनताई पाटील यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन का? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.


पोटकालव्यांची रखडलेली कामे
‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका
पाणी आल्यानंतर त्याच्या वाटपाचे विस्कळीत नियोजन, आवर्तनाची अनिश्चितता
पाण्याची कालव्यांतून होणारी भरमसाट गळती
पाणीपट्टी भरण्याविषयीची नकारात्मक मानसिकता

Web Title: Mhasal Lift Irrigation Scheme is in the grip of uncertainty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.