म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 07:03 PM2020-02-22T19:03:57+5:302020-02-22T19:05:46+5:30
कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.
मिरज : पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी जुलैपासून तब्बल आठ महिने बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. योजनेच्या आरग, सलगरे, बेडग व कवठेमहांकाळ परिसरात कालव्याची गळती काढण्याचे व अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यासाठी जत व कवठेमहाकांळ तालुक्यातून पाण्याची मागणी होत आहे.
गतवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू असताना, योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर एप्रिलपासून ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी १५४ दिवसांत सुमारे ७ टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत चांगल्या पावसाने तीनही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाली.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे लागते, मात्र यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तीनही तालुक्यातून पाण्याची मागणी नसल्याने योजना सुरू करण्यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. योजना आठ महिने बंद असल्याने आरग, बेडग व सलगरे मुख्य कालव्याची गळती काढण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात आली. १ मार्चपासून योजना सुरू करण्याच्या हलचाली सुरू असून, त्यासाठी आरग, बेडग कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. कालव्यांचे अस्तरीकरण व व्हॉल चेंबर्स बसविण्यात आल्याने पाण्याची गळती कमी होणार असल्याचे म्हैसाळच्या अधिका-यांनी सांगितले.
कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.
मागणी नसल्याने आवर्तन रखडले
म्हैसाळ योजनेच्या गतवर्षीच्या आवर्तनाचे थकीत विजबिल सुमारे ३२ कोटी रुपये व पाणी बिलाची थकबाकी सुमारे ३० कोटी रुपये आहे. ६० कोटी रुपये थकबाकी असल्याने यावर्षी आवर्तन सुरू करण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून वसुली करावी लागणार आहे. मात्र योजनेचा विद्युतपुरवठा खंडीत नसल्याने १ मार्चपासून सुरू झालेले आवर्तन पावसाळा सुरू होईपर्यंत चालणार आहे. टेंभू व ताकारी योजना महिन्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. मात्र पाण्यासाठी शेतकºयांची मागणी नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले होते.