म्हैसाळ योजनेचे दहा लाख भरले
By admin | Published: March 17, 2016 12:14 AM2016-03-17T00:14:00+5:302016-03-17T00:18:43+5:30
जत तालुक्यातील शेतकरी सरसावले : पाणी तात्काळ सोडण्याची मागणी
-जत : तालुक्याच्या उत्तर भागाला वरदार ठरणारी म्हैसाळ योजना चालू करण्यासाठी शेगाव, कुंभारी, गुळवंची, वाळेखिंडी, कोसारी, रेवनाळ, बनाळी येथील शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सुमारे १० लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे.
शेगाव (ता. जत) येथील जय सहकार पाणी वापर संस्थेच्या शेतकऱ्यांनी ३ लाख २१ हजार रुपयांचा धनादेश आ. विलासराव जगताप यांच्याहस्ते व म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत म्हैसाळचे पाणी सोडावे, या मागणीने जोर धरला आहे. विविध संघटनांनी आंदोलनेही केली. मात्र शासनाने थकबाकी भरल्याशिवाय पाणी सोडणार नाही, ही भूमिका घेतली. आ. जगताप यांनी शासनाची भूमिका शेतकऱ्यांना समजण्यासाठी जत उत्तर भागात शेगाव येथे लाभक्षेत्रातील १८ गावांची बैठक घेतली. या बैठकीत थकबाकी भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार शेगाव येथील साठवण तलाव क्रमांक १ ची थकबाकी ३ लाख २३ हजारपैकी ३ लाख २१ हजारांची रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली. ही रक्कम आ. जगताप यांच्याहस्ते म्हैसाळ योजनेचे उपविभागीय अभियंता शंकर शिंदे यांच्याकडे प्रदान केली. दरम्यान, कुंभारी येथील
तलाव क्रमांक १ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी १ लाख ५७ हजारांची रक्कम, तर कोसारी तलावाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांचा धनादेश काढून अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. दरम्यान, गुळवंची, वाळेखिंडी कार्यक्षेत्रातील थकबाकी भरण्यास शेतकरी पुढे येत असून, दोन लाखांपर्यंत रक्कम जमा होत आहे, तर शेगाव साठवण तलाव क्रमांक २ च्या लाभक्षेत्रातील शेगाव व बनाळी येथील शेतकऱ्यांनी ३ लाख रुपये जमा केले आहेत.
एकूणच जत उत्तर भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या थकबाकीतील रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी येण्याची आशा निर्माण झाली आहे. थकबाकी भरण्यास शेतकऱ्यांची मानसिकता तयार होत असल्याने पाणी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे भागात पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे. धनादेश देताना शेगाव साठवण तलाव क्रमांक १ चे पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी लक्ष्मण बोराडे, सचिन बोराडे, आर. डी. शिंदे, सुभाष पाटील, शहाजी गायकवाड, अशोक शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)