म्हैसाळ योजना वसंतदादा कारखाना चालविणार
By admin | Published: June 2, 2016 01:14 AM2016-06-02T01:14:39+5:302016-06-02T01:14:39+5:30
जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव : सुरुवातीला कळंबीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंतच्या योजनेसाठी आग्रही
सांगली : शासनाकडून ज्यापद्धतीने धडक योजना ताब्यात घेऊन यशस्वीपणे कारखान्याने चालविल्या, त्याचपद्धतीने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हैसाळ योजना चालविण्यासाठी उत्सुक आहे. सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यापर्यंतची म्हैसाळ योजना चालविण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेचा जेवढा वार्षिक खर्च आहे, तो आम्ही करण्यास तयार आहे. जेवढ्या योजनेची जबाबदारी कारखाना घेईल, तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून वसुली होईल. अन्य पिके व बागा असणाऱ्यांकडूनही वसुलीसाठी प्रयत्न केले जातील. ही योजना कारखान्यामार्फत चालविली गेली, तर योजनेच्या परिसरात किमान आठ हजार हेक्टर क्षेत्रात उसाचे जादा उत्पादन होऊ शकते. त्यामुळे कारखान्याला जादा ऊस मिळेल, शिवाय तो अन्य कारखान्यांसाठीही उपलब्ध होईल. त्यामुळे कारखान्याला हा फायदा होईल आणि योजनेच्या बिलाचे त्रांगडेही दूर होणार आहे. ही योजना बारमाही सुरू राहू शकते.
सुरुवातीला दोन टप्प्यांपुरती आमची तयारी आहे. त्यानंतर पुढील सर्व टप्प्यांची जबाबदारी स्वीकारून कारखाना संपूर्ण योजनाच चालविण्यास घेऊ शकते. दुसऱ्या टप्प्यापर्यंतचे वीजबिल स्वतंत्र करावे, अशा मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला आहे. कारखान्यामार्फत ही योजना यशस्वीपणे चालविली जाऊ शकते. यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात जे शेतकरी वसंतदादा कारखान्यास ऊस घालतील, त्यांच्या योजनेचे संपूर्ण बिल कारखाना भरेल. वसंतदादा कारखाना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही या योजनेच्या माध्यमातून बदल घडवू. टेंभू योजनेचा काही भागही चालविण्यासाठी कारखाना तयार आहे. शासन निर्णयावर सर्व अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
शंभर वसंत बंधारे : उपक्रम राबविणार
यंदा वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात शंभर वसंत बंधारे उभारण्यासाठी वसंतदादा कारखाना पुढाकार घेणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्या फंडातून काही कामे करावी लागतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न चालू झाले आहेत. कारखाना या उपक्रमासाठी पुढाकार घेणार आहे. समाजातील अन्य घटकांची मदत यासाठी घेतली जाणार आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली.
असे आहे आर्थिक गणित
कारखान्याच्या जवळच्या भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून उसाची मोठी उपलब्धता झाली, तर बाहेरील जिल्ह्यातील प्रतिटन दोन हजार रुपये अतिरिक्त खर्च करून ऊस आणण्याची वेळ येणार नाही. यातून कारखान्याचे सुमारे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. दुसरीकडे सध्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च योजना चालविण्यासाठी येणार आहे.
शेतकऱ्यांवर बंधन नाही
योजना चालविताना ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, पीक कोणते घ्यावे, याबाबतचे कोणतेही बंधन नसेल, मात्र वसंतदादा कारखान्याला ऊस दिल्यास त्याचा आर्थिक फायदा त्यांना होणार आहे. याशिवाय आगाऊ पैसे भरावे लागणार नाहीत.