‘म्हैसाळ’च्या पाण्याचे राजकारण पेटले

By admin | Published: March 2, 2016 11:25 PM2016-03-02T23:25:17+5:302016-03-03T00:03:28+5:30

काँग्रेस-भाजपच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी : श्रेयवादात जत तालुक्यातील शेतकऱ्यांची फरफट

'Mhasal' water politics arose | ‘म्हैसाळ’च्या पाण्याचे राजकारण पेटले

‘म्हैसाळ’च्या पाण्याचे राजकारण पेटले

Next

अशोक डोंबाळे -- सांगली -म्हैसाळ योजना सुरू होऊन बारा दिवस झाले तरीही ते पाणी बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथून पुढे गेलेले नाही. जत आणि सांगोला तालुक्यातील शेतकरी या पाण्याकडे लक्ष ठेवून असतानाच काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाद रंगला आहे. जतचे भाजपचे आमदार विलासराव जगताप सरकारची बाजू सांगत असून, थकबाकी भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करीत आहेत. दुसऱ्या बाजूला थकित पाणीपट्टीसाठी पाणी थांबवू नका, असा पवित्रा काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांनी घेतला आहे. या वादामध्ये जत तालुका होरपळत आहे.
म्हैसाळ योजनेचा मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला तालुक्यातील ८३ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. पोटकालवेच नसल्यामुळे निश्चित किती लाभक्षेत्राला पाण्याचा लाभ होतो, हे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. शिवाय, पाणीपट्टी वसुलीची सक्षम यंत्रणा आणि पुरेसा अधिकारी, कर्मचारीवर्ग नसल्यामुळे म्हैसाळ योजनेच्या थकित पाणीपट्टीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षामध्ये सुरु राहिलेल्या म्हैसाळ योजनेची शेतकऱ्यांकडे २८ कोटींची पाणीपट्टी थकित आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर त्याचा बोजाही चढविला आहे. या २८ कोटींपैकी एक कोटीची थकित पाणीपट्टी जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. उर्वरित २७ कोटींची थकित पाणीपट्टी कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व, तासगाव, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल झाली नसल्यामुळे १४ कोटींचे वीज बिल थकित आहे. या थकबाकीसाठी म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधितही थकबाकीचा प्रश्न होताच. पण, जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे वीज बिलाची थकबाकी टंचाई निधीतून भरली जात होती.
सध्या भाजपचे सरकार असल्यामुळे यांनी थकित पाणीपट्टी वसूल करूनच वीज बिल भरण्याची भूमिका घेतली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे यांनीही तशीच भूमिका घेतली आहे. भाजप नेत्यांच्या या भूमिकेला शह देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी थकित वीज बिल टंचाईतून भरण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पण, याकडे भाजपच्या नेत्यांनी फारसे गांभीर्याने लक्ष न देता शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी भरूनच दि. २० फेब्रुवारी रोजी म्हैसाळचे वीज पंप सुरू केले.
बारा दिवसात हे पाणी बोरगाव येथे पोहोचले आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी थकित पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी न सोडण्याचा अधिकाऱ्यांनी पवित्रा घेतला आहे. यास जगताप यांनीही पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांनी थकबाकी भरली तरच योजना सुरळीत चालू राहाणार असल्याचे ते म्हणत आहेत. जगताप यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांनी विरोध केला आहे. आधी पाणी सोडा, त्यानंतर शेतकरी थकित पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत, भाजपचे नेते शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक करीत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या संघर्षात दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांची मात्र फरफट होताना दिसत आहे.
म्हैसाळ योजनेकडील अधिकाऱ्यांनीही नेत्यांच्या राजकारणात न पडता थकित पाणीपट्टी वसुलीसाठी प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. शासनाने पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. पण, प्रत्यक्षात या विभागाकडे पुरेसा अधिकारी, कर्मचारी वर्गच नाही. जत तालुक्यातील पाणीपट्टी कुठे भरायची, याबद्दल शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. या शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरण्याची इच्छा असून, पाणी मागणी करण्यास ते तयार आहेत. पण, यासाठी त्यांना कवठेमहांकाळला यावे लागत आहे. प्रशासनाने थकित पाणीपट्टी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याची तयारी दर्शविली, तर निश्चित शंभर टक्के थकबाकी वसूल होईल.
या प्रश्नाकडे अधिकारी आणि नेत्यांही राजकारण न करता लक्ष दिल्यास वसुलीचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे.

टँकरची मागणी वाढली
सध्या ५९ गावे, ४५१ वाड्या-वस्त्यांवर एकूण ७२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. टंचाईची झळ १ लाख ५५ हजार लोकसंख्येला बसली आहे. टँकरच्या दररोज १८३ खेपा करण्यात येत आहेत. पाण्याच्या पुरवठ्यासाठी ७८ खासगी विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरसाठी दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. आणखी सुमारे वीस टँकरची मागणी प्रशासनाकडे प्रलंबित आहे. यंदा सुमारे दीडशे टँकर लागतील, असा अंदाज आहे.

जत तालुक्यातील शेतकरी पंचवीस लाख भरणार
जत नगरपालिका दहा लाख, कुंभारी नऊ लाख , प्रतापूर एक लाख २५ हजार, हिवरे पन्नास हजार, भागेवाडी एक लाख रुपये आणि अन्य गावे असे २५ लाख रुपये भरण्यास तयार आहेत. या गावांनी पाण्याची मागणीही केली आहे. पण, याकडे अधिकारी दुर्लक्ष करून शासनाकडे चुकीचा संदेश पोहोचवत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जिल्ह्यात केवळ दहा टक्केच पाणीसाठा
जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे ७८ लघु आणि पाच मध्यम तलावांपैकी ४५ तलाव फेब्रुवारीतच कोरडे पडले आहेत. उर्वरित तलावांमध्येही केवळ दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी, जत तालुक्यात दोड्डानाला, संख आणि शिराळा तालुक्यात मोरणा असे मध्यम पाच तलाव आहेत. या तलावांची दोन हजार ३०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या मृत आणि उपयुक्त पाणीसाठा केवळ ४०९.१८ दशलक्ष घनफूट आहे. टक्केवारीचा विचार केल्यास एकूण पाणीसाठ्याच्या केवळ आठ टक्केच साठा पाच मध्यम तलावात आहे. याशिवाय जिल्ह्यात लघु ७८ पाझर तलाव असून, यामध्ये ७ हजार १३३.९९ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. यापैकी १९ तलाव कोरडे ठणठणीत असून, २५ तलाव कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. २९ तलावांमध्ये २५ टक्केच पाणीसाठा आहे.



म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांना सवय लागली पाहिजे. एवढी मोठी योजना सुरळीत चालायची असेल, तर पैशाची गरज आहे. शेतकरी देणार नसतील, तर योजनेचे वीज बिल कुठून भरायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. राजकर्त्यांनी राजकारण न करता थकित पाणीपट्टी भरण्यासाठी मदत करावी.
- विलासराव जगताप,
आमदार, भाजप.


जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्वीही पाणीपट्टीची रक्कम दिली आहे. सध्याही कुंभारी, शेगाव, धावडवाडी, कुंभारी, हिवरे, बागेवाडी ही गावे आणि जत नगरपालिका वीस ते पंचवीस लाख रुपये भरण्यास तयार आहेत. पण, भाजप सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासाठी म्हैसाळचे पाणी जत तालुक्यास देत नाही. या प्रश्नावर आम्ही आंदोलन छेडणार आहोत.
- सुरेश शिंदे, काँग्रेस नेते, जत.

Web Title: 'Mhasal' water politics arose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.