नियोजनाअभावी म्हैसाळ पाणी योजनेचे कार्यक्षेत्र कोरडे
By admin | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:09+5:302016-03-16T08:29:28+5:30
बेभरवशाच्या म्हैसाळ प्रकल्पावर आर्थिक हमीची शेतकऱ्यांना कोणतीही पिके घेता येत नसल्याने बागायती जमिनी मोकळ्याच राहिल्या आहेत.
नरवाड : म्हैसाळ प्रकल्पाच्या नियोजनासाठी शेतीस पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच पडल्या आहेत.
कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी रोवली. यानंतर टप्प्याटप्प्याने कृष्णा नदीपासून कवठेमहांकाळपर्यंत ६ टप्प्याने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. म्हैसाळ प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राखाली मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुका येतो.
अवघ्या ९ कोटी १५ लाख रुपये मंजुरीच्या म्हैसाळ प्रकल्पाच्या योजनेवर वेळोवेळच्या दिरंगाईमुळे १ हजार कोटींचा आकडा पार झाला. तरीही योजना अपूर्णच राहिली आहे. दरम्यानच्या कालावधित म्हैसाळ प्रकल्पाची आवर्तने झाली.
आजवरच्या आवर्तनांमध्ये एकही आवर्तन हंगामनिहाय सुरू झाले नाही. पाटबंधारे खात्याकडे म्हैसाळ प्रकल्पाचे कोणतेही नियोजन नसल्याने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळोवेळी पाणी मिळाले नाही.
परिणामी योजनेवरील विद्युत बिलांची थकित बाकी वाढत गेली. सद्य स्थितीत सुरू झालेले ४५ दिवसांचे आवर्तन गेल्या २ महिन्यांपूर्वीच चालू होणे गरजेचे होते. मात्र तसे न होता पिके वाळून गेल्यावरच आवर्तन सुरू झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच राहिल्या आहेत. बेभरवशाच्या म्हैसाळ प्रकल्पावर आर्थिक हमीची शेतकऱ्यांना कोणतीही पिके घेता येत नसल्याने बागायती जमिनी मोकळ्याच राहिल्या आहेत.
चालू आवर्तनात ऊस, केळी, हळद यासारख्या नगदी पिकांची शेतकरी लागवड करण्यास तयार आहेत. मात्र भविष्यात आवर्तन सुरू होण्याची कोणतीही खात्री पाटबंधारे खाते देत नसल्याने पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच सोडाव्या लागत आहेत. (वार्ताहर)