‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून कलगीतुरा रंगला
By Admin | Published: March 13, 2016 11:26 PM2016-03-13T23:26:21+5:302016-03-14T00:07:08+5:30
अनेक भागात पाणी पोहोचलेच नाही : दुजाभाव होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
सांगली : म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी आणि त्याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, या पार्श्वभूमीवर अखेर शेतकऱ्यांनी व साखर कारखान्यांनी भरलेल्या रकमेतून पाणी सुरु झाले असले तरी, पाण्याच्या लाभावरुन गावा-गावांत चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून आवर्तनाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात झालेली दिरंगाई व शेतकऱ्यांकडून काही विशिष्ट भागालाच पाणी सोडले जात असल्याच्या आरोपामुळे शेतकऱ्यांत असंतोष दिसत असून, म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समान पाणी मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.
यावर्षी प्रथमच म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तीव्र स्वरुपाचा संघर्ष करावा लागला. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागणीअगोदरच काहीवेळा आवर्तने सुरु झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, थकबाकी भरावी, या मुद्यावर शासनाने घेतलेली ठाम भूमिका व शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा आवर्तन सुरु झाले. यातही साखर कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका घेत थकबाकी भरण्यास मदत केल्यानेच आवर्तन सुरु होऊ शकले.
आवर्तन सुरु होऊन त्याचा वापर सुरु झाला असतानाच, आता मुख्य कालव्यांर्तगत येणारे शाखा कालवे व पोटकालव्यांना पाणी सोडण्यावरुन शेतकऱ्यांतच संघर्ष होताना दिसत आहे. प्रशासनाने सर्वप्रथम मुख्य कालव्यातून संपूर्ण लाभक्षेत्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले असून त्यासाठी कोठेही सायफन पध्दतीने अथवा इतर मार्गाने पाणी उचलण्यास मनाई केली होती. यातूनच आरग येथे कालवा अडवून तलावात पाणी सोडण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासनाने कालव्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
आता म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील खंडेराजुरी शाखा कालव्यातून व कळंबी शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी, आवर्तन सुरु होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पाणी सोडण्यात आल्याने आमची पिके जळून गेल्यानंतर पाणी सोडल्याचा आरोप या भागातील शेतकरी करीत आहेत. थकबाकी वसुलीस प्रतिसाद देणाऱ्या मालगाव भागात कळंबी शाखा कालव्यातून पाणी पोहोचत असले तरी, या कालव्यातून दोन दिवसापूर्वी पाणी सोडण्यात आले आहे. खंडेराजुरी शाखा कालव्यात झुडपे वाढल्याने पाण्यास अडथळा निर्माण होत असून शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली होताना ती पूर्णवेळची होणार आणि त्याचा लाभ मात्र पंधरा दिवस उशिरा मिळत असल्यानेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हीच अवस्था पोटकालव्यांची असून अनेक भागात वारेमाप पाणी सोडण्यात आले असून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असताना, खरी पाण्याची गरज असणारा भाग मात्र वंचित राहत आहे. यात राजकीय दबावामुळे प्रशासन नामोहरम झाल्याचेच दिसून येत आहे. प्रशासनाने आता पोटकालवे आणि शाखा कालव्यांची पाहणी करुन नियोजनाची गरज असताना, असे होत नसल्यानेच शेतकऱ्यांत असंतोष निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)
पाण्याचे नियोजन करा, अन्यथा आंदोलन छेडणार
पाण्याचे नियोजन योग्य होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असून प्रशासनाने तातडीने पाण्याचे नियोजन करावे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचा लवकरच दौरा करुन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. कोणताही गट-तट न पाहता सर्व भागाला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रशासनाने तातडीने पाण्यापासून वंचित भागाला पाणी सोडण्याचे नियोजन करावे. प्रसंगी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मिरज पंचायत समितीचे सभापती जयश्री पाटील यांनी दिला.
हजारो लिटर पाण्याची नासाडी
योजनेच्या पोटकालव्यातून सोडण्यात आलेले पाणी त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर बंद होणे गरजेचे असताना, पाणी सुरुच राहिल्याने विनावापर हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मिरज पूर्व भागातील अनेक गावांत रस्त्याच्या कडेने असे पाणी वाया जाताना दिसून येत आहे.