म्हैसाळच्या अद्ययावत स्मशानभूमीने लक्ष वेधल
By admin | Published: January 10, 2015 12:08 AM2015-01-10T00:08:38+5:302015-01-10T00:16:44+5:30
नागरिकांत समाधान : अंत्यविधीसाठी कट्टे, मुंडण शेडची व्यवस्थो
सुशांत घोरपडे- म्हैसाळ -म्हैसाळ (ता. मिरज) येथील स्मशानभूमी जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत स्मशानभूमीची वानवा असताना, ही स्मशानभूमी सर्वसुविधांनी युक्त असल्याने नागरिकांतून व अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी तीन कट्टे, तर पावसापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था, दहाव्या दिवशी मुंडण कार्यक्रमासाठी मुंडण शेड व पाण्याच्या टाकीची व्यवस्था, त्याचबरोबर जवळपास शेकडो झाडांची लागवड व नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीतून पाणी आणण्यासाठी पायऱ्यांची सोय केली आहे. स्मशानभूमीजवळ पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गावातील महिलांनी पाठपुरावा करून ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. मनोरमादेवी शिंदे यांनी पुढाकार घेऊन नवा आदर्श घालून दिला. या कामासाठी गावातील सत्ताधारी गटाचे नेते मनोज शिंदे यांनी प्रयत्न करून निधी आणला. ग्रामसेवक एल. ए. सनदी, सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच परेश शिंदे यांचे याकामी सहकार्य लाभले.
रक्षा झाडांच्या बुंध्याला
रक्षाविसर्जनानंतर रक्षा नदीमध्ये सोडण्याऐवजी या रक्षा झाडांच्या बुंध्याला घालण्याचा नवा उपक्रम ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आला आहे.
रक्षाविसर्जनानंतर रक्षा नदीत सोडल्यामुळे पाण्यातील प्रदूषण वाढते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे व नागरिकांमधूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- परेश शिंदे-म्हैसाळकर, उपसरपंच, म्हैसाळ