‘म्हैसाळ’प्रश्नी मुख्यमंत्र्यांचीही नकारघंटा
By admin | Published: February 5, 2016 01:04 AM2016-02-05T01:04:52+5:302016-02-05T01:08:04+5:30
मुंबईत चर्चा : दोन टप्प्यात पाच कोटी भरण्याचा तोडगा
मिरज : शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने खासदारांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, ‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, पाच कोटी दोन टप्प्यांत शेतकऱ्यांनी भरल्यास ‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
खा. संजय पाटील, खंडेराव जगताप, भारत कुंडले, साहेबराव जगताप, तानाजी पाटील, गंगाराम तोडकर, यांच्यासह मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मिरज पूर्व भागासह तीन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. थकित पाणीपट्टीसाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले नसल्याने द्राक्ष व फळबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार असल्याने योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांनी किमान पाच कोटी रुपये भरल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापैकी अर्धी रक्कम तरी भरा, तरच पाणी सोडण्यात येईल. टंचाई निधीतून पैसे भरले जाणार नाहीत. पैसे भरल्याशिवाय पाणी सोडायचे असते, तर यापूर्वीच सोडले असते, असे स्पष्टपणे सांगितले. शेतकऱ्यांकडून पाच कोटी जमा होत नसतील, तर सुरुवातीला अडीच कोटी व पाणी सुरू झाल्यानंतर अडीच कोटी भरावेत, असा तोडगा मुख्यमंत्र्यांनी सुचविला.
‘म्हैसाळ’च्या पाण्याअभावी शेतकरी अडचणीत आल्याचे खासदारांनी सांगितल्यानंतर, गेल्यावेळी ‘म्हैसाळ’ची दोन आवर्तने सोडण्यात आली, मात्र शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत. आतापर्यंत ११ आवर्तने सोडण्यात आली आहेत. आता शेतकऱ्यांना पाण्यासाठी पैसे भरण्याची सवय होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी एकरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांनीभरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत केवळ २२ लाख रूपये जमा झाले आहेत. पाणी सोडल्यानंतरच पाणीपट्टी भरू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी मिळणे कठीण आहे. ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक असून दि. ९ रोजी मिरज पूर्व भागातील २८ गावांत बंद पाळून दि. १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.