’म्हैसाळ’चे आवर्तन रखडण्याची चिन्हे

By admin | Published: January 1, 2017 10:55 PM2017-01-01T22:55:22+5:302017-01-01T22:55:22+5:30

पिकांना फटका : थकबाकी भरण्यास कर्नाटकातील कारखान्यांचा प्रतिसाद नाही

'Mhaysal' recursion signs | ’म्हैसाळ’चे आवर्तन रखडण्याची चिन्हे

’म्हैसाळ’चे आवर्तन रखडण्याची चिन्हे

Next

मिरज : ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यासाठी कर्नाटकातील साखर कारखान्यांनी प्रतिसाद दिलेला नसल्याने, म्हैसाळ योजनेचे पंप बंदच आहेत. ३६ कोटी वीज व पाणीपट्टी थकबाकीमुळे ‘म्हैसाळ’चे आवर्तन रखडल्याने बागायती पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रूपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्यात आले होते. मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात शेती व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला होता.
मात्र यावर्षी म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी कारखान्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. पाणीटंचाई सुरू झाल्याने ‘म्हैसाळ’चे पंप सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वारणा व कोयना धरणात पाणीसाठा मुबलक असतानाही डिसेंबरमध्ये ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्याचे नियोजन बारगळले आहे. थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांनी रक्कम जमा केली नसल्याने, ‘म्हैसाळ’चे आवर्तन कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे.
गतवर्षी आॅगस्ट ते आॅक्टोबर व फेब्रुवारी ते जून अशा दोन टप्प्यात सोडण्यात आलेल्या ‘म्हैसाळ’च्या पाण्याचे व वीज बिलाचे ३६ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित आहे. आता ‘म्हैसाळ’च्या आवर्तनासाठी थकीत वीजबिल भरावे लागणार आहे. मात्र पाणीपट्टी वसुली होत नसल्याने ‘म्हैसाळ’चे पंप बंदच आहेत. ताकारी योजना सुरू करण्यासाठी चार साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील कारखान्यांकडून थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही.
सीमाभागातील अथणी, केंपवाड व उगार कारखान्यांना म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस जात असल्याने ‘म्हैसाळ’च्या योजनेच्या अधिकाऱ्यांनी सीमाभागातील साखर कारखान्यांना लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाठवून, त्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम कपात करण्याची मागणी केली आहे. मात्र कर्नाटकातील कारखान्यांनी यासाठी शेतकऱ्यांच्या संमतीची मागणी करून पाणीपट्टीची रक्कम कपात करण्यास नकार दिला आहे. तसेच मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील कारखान्यांनी अद्याप म्हैसाळ योजनेच्या वीज बिलासाठी रक्कम भरण्याबाबत प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे ‘म्हैसाळ’चे आवर्तन रखडले आहे.
पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू झाले नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. (वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांचा दौरा : तोडगा नाहीच
ढालगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांनी ‘म्हैसाळ’चे पंप सुरू करण्याचे आश्वासन न देता, योजनेची विस्तारित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ‘म्हैसाळ’च्या थकबाकीबाबत तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्री, जलसंपदामंत्री व ऊर्जामंत्र्यांची होणारी बैठक बारगळल्याने, ‘म्हैसाळ’चे पंप सुरू होण्याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
कारखान्यांकडून कपातीस टाळाटाळ
यावर्षी ऊस टंचाईमुळे म्हैसाळ योजनेच्या पाणीपट्टीची कपात केल्यास ऊस कर्नाटकातील कारखान्यांकडे जाण्याची शक्यता असल्याने, स्थानिक कारखाने ऊस बिलातून कपात करण्यास टाळत आहेत. कर्नाटकातील कारखान्यांनीही पाणी बिल कपात करण्याची स्थानिक कारखान्यांची मागणी असल्याने, थकबाकी वसुली रखडली आहे.

Web Title: 'Mhaysal' recursion signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.