‘म्हैसाळ’चे पाणी सुरू...

By admin | Published: February 21, 2016 12:57 AM2016-02-21T00:57:45+5:302016-02-21T00:57:45+5:30

पाण्याचे राजकारण थांबवा : चंद्रकांतदादा पाटील

'Mhaysal' water starts ... | ‘म्हैसाळ’चे पाणी सुरू...

‘म्हैसाळ’चे पाणी सुरू...

Next

म्हैसाळ : चार महिने बंद असलेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप अखेर शनिवारी सुरू झाले. श्रेयवाद उफाळल्याने आणि या समारंभावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने पंपगृहाचे बटन प्रकाश देवर्षी, गोपाळ शेळके या शेतकऱ्यांच्याहस्ते दाबण्यात आले. पाण्याचे पैसे भरायचा कायदा आहे. त्यामुळे कायदा पाळा, हे सांगणे गुन्हा कसा होतो? शिव्या, शाप देण्यापेक्षा योजना सुरू राहण्यासाठी प्रयत्न करा, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यावेळी यांनी विरोधकांना लगावला.
म्हैसाळ (ता. मिरज) येथे टप्पा क्र. १ मधील पंपगृहावर हा कार्यक्रम झाला. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, दीपक शिंदे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणारी म्हैसाळ योजना वीज थकबाकीमुळे चार महिने बंद होती. या थकबाकीतील पाच कोटी रुपये शेतकऱ्यांनी आणि कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांनी भरले आहेत. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, तासगाव या तालुक्यांत टंचाईची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे विविध पक्ष-संघटनांनी पाणी सोडण्यासाठी रेटा लावला होता. अखेर शनिवारी योजनेचे पंप सुरू करण्यात आले.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतीतूनच आम्ही पाणीपट्टीत ३३ टक्के सूट दिली आहे. इतर तालुक्यातील सिंचन योजना शेतकरीच चालवतात, मग म्हैसाळ याजनेबाबत वेगळा न्याय कसा द्यायचा? राजकारण करताना शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही. राज्यातील चार खात्यांची जबाबदारी माझ्यावर असल्याने कधी कधी दुर्लक्ष होते, पण त्याचा आढावा मी घेत असतो. इतर पक्षातील नेतेमंडळींनी चुकीची माहिती सांगून शेतकऱ्यांना भडकवू नये. समाजामध्ये विध्वंसाचे राजकारण कशाला करता? पाण्याचे पैसे भरायचा कायदा आहे. त्यामुळे कायदा पाळा, हे सांगणे गुन्हा कसा होतो?
खासदार पाटील म्हणाले की, या योजनेला विघ्नसंतोषी मंडळींनी खीळ घालू नये. ते गोरगरीब शेतकऱ्यांच्या ताटात विष कालवण्यासारखे होईल. ही योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी अथणी शुगर व राजारामबापू साखर कारखाना प्रत्येकी ५० लाख इतकी रक्कम देणार आहेत. योजना कायमस्वरूपी सुरू ठेवायच्या असतील, तर सरकारबरोबर शेतकऱ्यांचा सकारात्मक सहभाग असला पाहिजे. टेंभू, आरफळ, ताकारी या योजना शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच सुरू आहेत.
आ. सुरेश खाडे म्हणाले की, आपले घर शाबूत ठेवायचे आणि दुसऱ्याचे घर जाळायचे, ही भूमिका विरोधकांनी घेऊ नये. म्हैसाळ योजना चालली, तर दुष्काळी भागातील शेतकरी कायमचा सुखी होईल.
आ. विलासराव जगताप म्हणाले, जत भागात ही योजना म्हणजे अमृत आहे. आपल्या मतदारसंघातील योजना चांगल्या चालवायच्या व म्हैसाळ योजनेबद्दल चुकीची माहिती सांगून ती बंद पाडायची, असा कुटिल डाव विरोधक खेळत आहेत.
जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, ही योजना सुरू करण्यासाठी कारखान्यांकडून ३ कोटी २६ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे हे आवर्तन सरकारतर्फे सुरू करण्यात आले आहे. टंचाईतून पैसे भरा, ही मागणी बरोबर नाही.
यावेळी गोपीचंद पडळकर, राजाराम गरूड, दिनकर पाटील, धनंजय कुलकर्णी, नाना कांबळे, अशोक वडर, रामदास कोरबी, भरत कसुरे, अभय कसुरे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी उपस्थित होते.
गाडगीळ यांच्याकडून पाच लाख
यावेळी मणेराजुरी येथील प्रकाश देवर्षी व गोपाळ शेळके या शेतकऱ्यांनी दहा लाख पाणीपट्टीपैकी पंचवीस हजारांचा धनादेश पालकमंत्री पाटील यांच्याकडे दिला. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पाच लाख रुपयांची देणगी दिली. दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी देणगी दिल्याचे आ. गाडगीळ यांनी सांगितले.
बहिष्कार आणि चलाखी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या कार्यक्रमास येणार नसल्याचे शुक्रवारीच जाहीर केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेच्याही प्रमुख कार्यकर्त्यांनी उद्घाटनावर बहिष्कार टाकला होता. कवठेमहांकाळच्या महांकाली साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे व आरगच्या मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे हे मात्र उपस्थित होते. उद्घाटनावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत: बटन दाबून उद्घाटन करणे टाळले. शेतकऱ्यांच्या हस्ते पंपाचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले.
 

Web Title: 'Mhaysal' water starts ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.