‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी चक्काजाम

By admin | Published: January 8, 2016 11:41 PM2016-01-08T23:41:36+5:302016-01-09T00:40:13+5:30

शिवसेनेचे आंदोलन : रास्ता रोकोने मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

'Mhaysal' water supply | ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी चक्काजाम

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी चक्काजाम

Next

कवठेमहांकाळ : म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी शुक्रवारी कवठेमहांकाळ तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर खरशिंग फाटा येथे दीड तास चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येत्या महिनाअखेर म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले. पाणी सोडले नाही, तर सांगली येथे म्हैसाळ योजनेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी दिला.
म्हैसाळ योजनेचे पाणी त्वरित सुरू करावे, ढालगाव विभागात टेंभू योजनेची कामे त्वरित सुरू करावीत, जनावरांना चारा छावण्या, चारा डेपो त्वरित सुरू करावेत, यांसह विविध मागण्यांसाठी शिवसेनेने शुक्रवारी मिरज-पंढरपूर मार्गावर खरशिंग फाटा येथे चक्काजाम आंदोलन करीत शासनाला घरचा आहेर दिला. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी राज्यमार्ग दणाणून सोडला.
खरशिंग फाटा येथे सकाळी ११.३० वाजता तालुक्यातून शेकडो शिवसैनिक जमा झाले. शिवसेना सत्ताधारी पक्ष असतानाही शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. तसेच सत्तेपेक्षा शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. राज्यमार्गावर दोन्ही बाजूला चार-चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तहसीलदार सचिन डोंगरे, पोलीस उपअधीक्षक नवनाथ वाकुंडे, पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा, नाही तर कायदेशीर कारवाई करू ,असे ठणकावले. परंतु शिवसैनिकांनी त्यांना जुमानले नाही.
या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली स्वत:वरील जबाबदारी टाळून, उपअभियंता टी. के. देसाई, शाखा अभियंता डी. बी. सावंत यांना आंदोलनस्थळी पाठविले. या दोन अधिकाऱ्यांच्या हातात कोणतेही अधिकार नव्हते.
म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी आंदोलनस्थळी यावे व लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. त्यानंतर उपअभियंता देसाई यांनी नलवडे यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंता नलवडे यांनी, शेतकऱ्यांनी पैसे भरावेत, या पैशातून वीज बिल भरले जाईल व जानेवारीअखेरीस पाणी सोडले जाईल, असे लेखी आश्वासन देण्याची सूचना भ्रमणध्वनीवरून केली. त्यांच्या सूचनेनुसार देसाई यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनानंतर शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात किशोर माळी, अक्षय पोतदार, पृथ्वीराज पाटील, सुशांत पाटील, अनिकेत साळुंखे, अजित भोसले, नंदकुमार पाटील, काशिलिंग थोरात यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: 'Mhaysal' water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.